22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूर११ तालुक्यातील ८५५ गावात 'जल जीवन मिशन'

११ तालुक्यातील ८५५ गावात ‘जल जीवन मिशन’

सोलापूर-
केंद्रीय स्तरावरून सुरू असलेल्या जल जीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात हर घर नल, हर घर जल’ या योजनेच्या बिद्रवाक्याप्रमाणे पाणी पोहोचविण्याकरीता हे मिशन यशस्वीरित्या राबविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिल्या. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनौल कटकधोंड यांनी चोख नियोजन केले व त्यांच्या टीमनेही या योजनेच्या कामाला गती दिल्याने सध्या जिल्ह्यातील ५ लाख ७६ हजार ६६७ नळ कनेक्शनपैकी ५ लाख ७० हजार १४६ नळ कनेक्शन दिली आहेत.

तर मार्च २०२४ पर्यंत उर्वरित ६ हजार ५२१ नळ कनेक्शन देण्यात येणार असल्याची माहिती जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून मिळाली. या जल जीवन मिशन योजनेकरीता केंद्राकडून आवश्यक निधी उपलब्ध होतो. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात पाणी पुरवठा होण्याकरीता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योजना यशस्वीरित्या राबविण्याकरीता समन्वयाने काम करावे अशा सुचना वेळोवेळी सीईओ आव्हाळे यांनी दिल्या होत्या. इतकेच कायतर त्यांनी जिल्ह्यातील काही स्पॉटवर जावून या कामाची
पाहणीही केली होती. जिल्ह्यातील जवळपास ५० ठेकेदारांना हे काम दिले असून, हे काम दर्जेदार होण्यासाठीही आव्हाळे यांनी कडक निर्देश दिले होते. यामुळेच ही योजना दर्जेदार आणि वेळेपूर्वी पूर्ण होत असल्याही माहिती या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

स्वातंत्र्यापासून २०१९ पर्यंत आपल्या देशात फक्त ३ कोटी घरांना नळाचे पाणी उपलब्ध होते. २०१९ मध्ये जल जीवन अभियान सुरू झाल्यापासून ५ कोटी घरांना पाणी जोडणी जोडण्यात आली आहे. आज देशातील सुमारे ८० जिल्ह्यांतील सुमारे १.२५ लाख गावांमध्ये प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचत आहे. महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये नळ जोडणीची संख्या ३१ लाखांवरून १.१६ कोटी झाली आहे. यामुळे प्रत्येक नागरिकांना पाणी बचतीचीही सवय लागणार आहे. आपल्या जिल्ह्यातील १ हजार १२६ गावांसाठी ही योजना कार्यान्वित होणार होती मात्र पूर्वीच्या शासनस्तरावरील पाणीपुरवठा योजना नदीकाठच्या बऱ्याच गावात चांगल्या असून, त्याद्वारे लोकांना पाणीपुरवठा सुरळीत होत आहे. यामुळे जिल्हाभरातून दुष्काळी स्थितीला तोंड देणाऱ्या ८५५ गावांची या योजनेसाठी निवड केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात ही योजना मार्च २०२२ पासून सुरू झाली. ही योजना ८३४ कोटीची असून, आजतागायत या योजनेवर २५१ कोटीचा खर्च झाला आहे. ८५५ गावांचे उद्दिष्ट होते. यातील १७४ गावे भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली आहेत. कामाची प्रगती-० ते २५-६६ गावे आहेत. २५ ते ५०-१५७ गावे, ५० ते ७५-२०० गावे आणि ७५ ते ९९ २५८ गावे तर १०० टक्के पूर्ण १७४ गावे आहेत.अक्कलकोट तालुक्यात १०० गावांत ही योजना राबतेय, तर बार्शी ८८, करमाळा १०४, माढा १११, माळशिरस ९०, मंगळवेढा ६१, मोहोळ ६०, पंढरपूर ६२, सांगोला ६९, उत्तर सोलापूर ३३ तर दक्षिण सोलापूर ७७ अशा ८५५ गावात ही योजना राबविण्यात येत आहे. या सर्व गावातील ६ हजार ५२१ नळ जोडण्या राहिल्या असून, त्यासाठी मार्च २०२४ पर्यंत कालावधी आहे मात्र त्यापूर्वीच ही योजना पूर्णत्वास जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR