मुंबई : ठाणे येथे एक खास रेल्वे स्टेशन उभं राहत आहे. हे रेल्वेस्टेशन एक दोन नाही, तर तब्बल ११ मजली असणार आहे. या रेल्वेस्टेशनमधून प्रवाशांच्या प्रवासाचीच आरामदायक व्यवस्था असेल असेच नव्हे, तर लोकांच्या मनोरंजनाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. या रेल्वे स्टेशनच्यावर मॉल, ऑफिस आणि रिटेल शॉपचीही व्यवस्था असेल. या प्रकल्पामुळे रेल्वे प्रवासाची सुविधा निर्माण होण्याबरोबरच या माध्यमातून सरकारला चांगला महसूलही प्राप्त होणार आहे.
ठाणे रेल्वे स्टेशनजवळील प्लॅटफॉर्म क्रमांक १०ए जवळील १० हजार मीटर परिसरामध्ये हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. त्याबरोबरच २४ हजार २८० वर्गमीटर भागामध्ये लीज स्पेससुद्धा आहे. ही जागा ६० वर्षांच्या लीजवर दिली जाऊ शकते. तसेच हा प्रकल्प ३० जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं आहे. या रेल्वे स्टेशनजवळ कनेक्टिव्हिटीवर पूर्ण लक्ष देण्यात आलं असून, त्याला बस आणि मेट्रोद्वारेही जोडलं जाणार आहे.