इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. यात भारताने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत पाकचे ११ सैन्य अधिकारी मारले गेले तर ७८ हून अधिक जखमी आहेत. भारतासोबतच्या संघर्षात पाकचा विजय झाला असा खोटा दावा करणा-या पाकिस्तानने तिथले वास्तव कबूल केले आहे.
पाकिस्तानने ११ सैन्य अधिकारी मारले गेल्याची कबुली दिली आहे. भारताच्या हल्ल्यात सैन्याच्या ११ अधिका-यांसह ४० जण मारले गेले. त्याशिवाय १२१ जखमी झाले. पाकिस्तानी लष्कराचे ६ जवान आणि एअरफोर्सचे ५ जवान ठार झाल्याचं पाकिस्तानने मान्य केले आहे.
पाकिस्तानी सरकारी माध्यमाकडून प्रसारित केलेल्या बातमीत, पाकिस्तानातील सैन्य जवान नायक अब्दुल रहमान, लान्स नायक दिलावर खान, लान्स नायक इकरामुल्लाह, नायक वकार खालिद, शिपाई मोहम्मद अदील अकबर, निसार यांचा समावेश आहे. पाकिस्तानी हवाई दलातील स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसूफ, मुख्य टेक्निशियन औरंगजेब, सीनियर टेक्निशियन नजीब, कॉर्पोरल टेक्निशियन फारूख आणि मुबाशिर यांचा मृत्यू झाला आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. त्यात १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे पुढे आले. पाकिस्तानी सैन्याने गार्ड ऑफ ऑनर देत तिथल्या ७ जणांच्या अंत्यसंस्काराला बड्या अधिका-यांनी हजेरी लावली. त्यामुळे भारताच्या हल्ल्यामुळे मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे चित्र जगासमोर आले. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केली होती. अनेक महिलांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतीला, वडिलांना, मुलांना मारण्यात आले होते. महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसणा-या या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले.
भारताचे ८ जवान शहीद
एलओसीवर पाकिस्तानने आपले ४० हून अधिक सैनिक आणि अधिकारी गमावले आहेत. भारतीय हवाई दलाच्या अचूक कारवाईत त्यांच्या १२ एअरबेसवर हल्ले झाले, ज्यात पाकिस्तानच्या ५२ पेक्षा अधिक वायुसैनिकांचा आणि अधिका-यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तथापि, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतालाही आठ जवानांचे बलिदान द्यावे लागले आहे.