लातूर : प्रतिनिधी
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत ११ लाख ४२ हजार ८७२ रुपयांचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित पान मसाला तंबाखू व सदर मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली स्कार्पिओ कंपनीची सहा लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण १७ लाख ४२ हजार ८७२ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करुन लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत.
अवैध धंद्याची माहिती काढत असताना दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, लातूर शहरातील बसवेश्वर चौकामध्ये एका वाहनांमध्ये काही इसम प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची चोरटी विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहनातून घेऊन जाणार आहे. ही खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अमलदारांच्या पथकाने बुधवारी रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बसवेश्वर चौक रिंग रोड येथे सापळा लावून गुटख्याची वाहतूक करणा-या वाहनास ताब्यात घेऊन पाहणी केली
त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे, महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटका व सुगंधित पानमसाला असा एकूण ११ लाख ४२ हजार ८७२ रुपयांचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित पान मसाला तंबाखू व सदर मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली स्कार्पिओ कंपनीची सहा लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण १७ लाख ४२ हजार ८७२ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश पल्लेवाड, पोलीस अमलदार राहुल सोनकांबळे, मोहन सुरवसे, नितीन कठारे, मनोज खोसे,राहुल कांबळे यांनी पार पाडली.
याबाबत पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आलेले उमर इस्माईल शेख, वय ३४ वर्ष, राहणार खोरी गल्ली, लातूर. शेख आफताब मेहमूद, वय ३८ वर्ष,राहणार खोरी गल्ली, लातूर. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौक पोलीस करीत आहेत.