मेम्फिस : वृत्तसंस्था
नेटफ्लिक्सवरील ‘यंग शेल्डन’ या वेबसीरीजचे चाहते जगभरात आहेत. या सीरीजमधील १० वर्षांचा प्रतिभावान शेल्डन कूपर याला विज्ञानाविषयी अतीव प्रेम आणि विश्वास आहे. यात शेल्डन स्वत:च्या खोलीत चक्क न्यूक्लियर रिअॅक्टर तयार करतो आणि ‘एफबीआय’ ची टीम त्याच्या दारात येते, असे दृश्य आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशीच एक सत्य घटना अमेरिकेच्या मेम्फिस टेनेसी येथे घडली आहे.
अमेरिकेतील मेम्फिस शहरातील १२ वर्षीय जॅक्सन ऑसवॉल्ट याने त्याच्या बेडरूममध्येच न्यूक्लियर फ्यूजन रिअॅक्टर तयार केला. सर्वात लहान वयात ही कामगिरी करणारी व्यक्ती म्हणून जॅक्सनची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदले गेले आहे.
तथापि, त्याच्या या कारनाम्याने अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली आणि लगोलग ‘एफबीआय’ने तत्काळ अॅक्शन घेत जॅक्सनच्या घरी धाव घेतली. जॅक्सनने केलेला प्रयोग सुरक्षित होता की नाही, याची खातरजमाही ‘एफबीआय’च्या पथकाने केली.
जॅक्सनला वैज्ञानिक प्रयोगांची मोठी आवड आहे. एके दिवशी ‘टेड टॉक’मध्ये त्याने टेलर विल्सन यांचा एपिसोड पाहिला होता. त्यात टेलर यांनी वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी कंट्रोल्ड न्यूक्लियर फ्युजन कसे केले याची माहिती दिली. त्यातून जॅक्सनला मोठी प्रेरणा मिळाली आणि त्यानेही ११ व्या वर्षी हा प्रयोग करण्याचा निर्धार केला.
सुरुवातीला त्याने फ्यूजन रिअॅक्टरच्या विज्ञानाचा अभ्यास केला आणि डेमो फ्युसर तयार केला. त्यासाठी त्याने पालकांकडून आर्थिक मदत घेतली. जॅक्सनने पोस्टमध्ये म्हटले आहे की, सुरवातीला तयार केलेला रिअॅक्टर पूर्णत: सक्षम नव्हता. त्यानंतर मी संपूर्ण व्हॅक्यूम चेंबर पुन्हा बनवले. ईबेवरून टर्बोमॉलेक्युलर पंप घेतला. थोड्या कायदेशीर मार्गाने ड्यूटेरियम इंधन मिळवले आणि टँटलमपासून नवीन इनर ग्रिड तयार केला.
एका वर्षाच्या अथक मेहनतीनंतर त्याचा रिअॅक्टर कार्यान्वित झाला आणि त्याच्या १३ व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधीच त्याने यशस्वीरित्या फ्यूजन साध्य केले. त्याने न्यूट्रॉन डिटेक्टरद्वारे याचे प्रमाणही मिळवले.
जॅक्सनच्या या उल्लेखनीय प्रयोगाची माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि अनेक माध्यमांतून प्रसिद्ध झाली. पण अमेरिकेच्या ‘एफबीआय’ या संरक्षण यंत्रणेने त्याच्या घरी भेट दिली. त्यांनी गीगर काउंटरने माझ्या खोलीत सर्व्हे केला आणि सगळं ठीक असल्याची खात्री केली. दरम्यान, या यशस्वी प्रयोगानंतर जॅक्सनला अनेक स्टार्टअप कंपन्यांनी भेटीसाठी बोलावले आहे.