नागपूर : प्रतिनिधी
नागपुरातील एका जोडप्याने त्यांच्या मुलाला शिस्त लावण्यासाठी हृदय पिळवटून टाकणारी कृती केली आहे. १२ वर्षांचा मुलगा सतत चुकीचे वर्तन करतो म्हणून त्याच्या आई-वडिलांनी त्याला साखळीने बांधून ठेवले. हा प्रकार गेले ३-४ महिने सातत्याने सुरू असल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरात राहणा-या एका जोडप्याला १२ वर्षांचा मुलगा आहे. हा मुलगा मस्ती करायचा आणि नेहमी चुकीचे वर्तन करत असल्याचे त्याच्या आई-वडिलांच्या लक्षात आले. त्यामुळे या मुलाचे आई-वडील रोजंदारीवर जाताना मुलाला क्रूरतेने साखळीने बांधून घरात डांबून ठेवायचे. हा अमानवीय प्रकार गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू होता. या क्रूर कृत्यामुळे मुलाच्या हाता-पायांना गंभीर आणि खोल जखमा झाल्या आहेत.
या घटनेची माहिती चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ वर बाल संरक्षण पथकाला देण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या आधारे बाल संरक्षण पथक घटनास्थळी दाखल झाले. मुलाची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि नंतर त्याला सुरक्षित बालगृहात हलवण्यात आले. मानसिक आघातातून बाहेर पडण्यासाठी त्याचे समुपदेशनही सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणी अजनी पोलिस ठाण्यात मुलाच्या पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा महिला व बालविकास विभागाकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. दोषी पालकांवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

