पहलगाम : वृत्तसंस्था
पर्यटकांवर झालेला क्रूर दहशतवादी हल्ला हा केवळ निष्पाप पर्यटकांवर हल्ला नाही तर काश्मीरच्या सांस्कृतिक वारशावर, त्याच्या आत्म्यावर आणि लाखो काश्मिरींच्या उपजीविकेवर थेट हल्ला आहे. दरवर्षी कोट्यवधी पर्यटक फिरण्यासाठी श्रीनगरला भेट देतात. श्रीनगर आणि काश्मीरमधील लोक या पर्यटकांद्वारे पैसे कमवतात कारण पर्यटन हे त्यांच्या उत्पन्नाचे साधन आहे.
काश्मीरमध्ये सुमारे १२,००० कोटी रुपयांचा पर्यटन उद्योग आहे, जो राज्याच्या जीडीपीमध्ये ७ ते ८ टक्के वाटा देतो. २०३० सालापर्यंत तो २५,००० ते ३०, ००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा होती. पण या हल्ल्यामुळे त्या विकास प्रवासाला एक मोठा ब्रेक लागला आहे.
२.५ लाख लोकांचा रोजगार धोक्यात : काश्मीरमध्ये हॉटेल्स, हाऊस बोट्स, टॅक्सी सेवा, गाईड, हस्तकला यासारखे पर्यटनाशी संबंधित उपक्रम हे सुमारे अडीच लाख लोकांच्या उपजीविकेचे साधन आहेत. दल सरोवरात चालणा-या १,५०० हून अधिक हाऊसबोट्स, ३,००० हून अधिक हॉटेल रूम आणि कॅब सेवा आता निर्जन होऊ शकतात. कालच्या हल्ल्यानंतर बुकिंग कॅन्सलेशनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फ्लाईट तिकीट्स ते हॉटेलस, टॅक्सी बुकिंग सगळंच रद्द होत चालले आहे.
गुलमर्ग ते दल सरोवर भयाण शांतता : गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आणि दल सरोवर यासारख्या पर्यटन स्थळांना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. २०२४ साली २.३६ कोटी पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली, त्यापैकी ६५,००० हून अधिक परदेशी होते. एकट्या गुलमर्गने १०३ कोटी रुपयांचा महसूल दिला. पण आता ही सर्व पर्यटन केंद्र अनिश्चिततेच्या सावटाखाली आहेत.
काश्मीर हे केवळ पर्यटकांचे आवडते ठिकाण नाही तर बॉलिवूड आणि ओटीटी निर्मात्यांचे आवडते शूटिंग डेस्टिनेशन देखील आहे. याशिवाय, डेस्टिनेशन वेडिंगच्या वाढत्या मागणीमुळे पर्यटनालाही चालना मिळाली. पण आता हल्ल्यामुळे चित्रपट युनिट्स आणि लग्नाचे नियोजन करणारे मागे हटू लागले आहेत.
विकासाला ब्रेक? : केंद्र सरकारने काश्मीरच्या विकासासाठी १००० कोटी रुपयांची योजना आखली होती. हवाई संपर्क सुधारला जात होता, वंदे भारत ट्रेन सुरू होणार होती आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ऑन-अरायव्हल व्हिसासारख्या योजना सुरू केल्या जात होत्या. ७५ नवी टूरिस्ट डेस्टिनेशन्स, हेरिटेज आणि धार्मिक स्थळांचाही विकास केला जात होता. पण एका दहशतवादी हल्ल्याने आता हे सर्व प्रयत्न फोल ठरवले आहेत.