वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफचा बॉम्ब फोडण्यास सुरुवात केली. ९० दिवसांचा कालावधी आता संपला आहे. सोमवारी ट्रम्प यांनी १४ देशांवर नवं शुल्क लावण्याची घोषणा केली. अमेरिकेचा जवळचा समजला जाणारा जपान आणि दक्षिण कोरियाही यातून सुटलेला नाही. पहिली दोन पत्रंही या देशांना पाठवण्यात आली होती. त्यावर २५ टक्के शुल्क आकारण्यात आलं आहे.
याशिवाय अमेरिकेने दक्षिण आफ्रिका, कझाकिस्तान, मलेशिया, म्यानमार आणि अगदी बांगलादेशवरही कडक शुल्क लादले. बांगलादेश हा त्या देशांपैकी एक आहे ज्यावर सर्वाधिक शुल्क लावण्यात आले आहे. पण लोकांना आश्चर्याचा धक्का बसला की, अमेरिकेने अद्याप भारत आणि चीनला स्पर्शही केलेला नाही.
आश्चर्याची बाब म्हणजे चीनही तसाच अमेरिकाविरोधी मानला जातो. तसंच नुकतेच दोन्ही देशांमध्ये शुल्कावरून प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ किंग म्हटलं आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देश या यादीतून वगळले गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
अद्याप कोणतेही औपचारिक विधान समोर आलेले नाही, परंतु काही दिवसांपूर्वी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी संकेत दिले होते की, भारतातील शेतक-यांच्या हिताच्या किंमतीवर कोणताही करार केला जाणार नाही. सध्या अमेरिका आणि भारत यांच्यात दुग्धजन्य पदार्थावरून चर्चा अडकली असण्याची शक्यता आहे. ज्यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे.
बांगलादेशवर शुल्क; भारताचा फायदा
अमेरिकेने भारताचा शेजारी बांगलादेशवर ३५ टक्के शुल्क लादलं आहे. म्हणजेच बांगलादेशातून अमेरिकेत जाणा-या कपड्यांवर ३५ टक्के शुल्क आकारलं जाणार आहे. यामुळे तेथे बांगलादेशी कपडे महाग होऊ शकतात आणि अमेरिकन कंपन्या येथून कपडे बनवणं थांबवू शकतात. याचा फायदा भारताला होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आज गोकलदास एक्सपोर्ट्स, वर्धमान टेक्सटाइल्स, केपीआर मिल्स आणि अरविंद मिल्स यांच्या समभागांमध्ये शेअर्समध्ये तेजी दिसून आली.