मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वाटेल ते करत आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. पायाला भिंगरी लावून प्रचाराचा तोफा डागत आहे. कुठेही कमी पडायला नको म्हणून, नातेवाईक, मित्र, मित्रांचे मित्र, बाहेर गावाहून माणसे बोलावून प्रचार सुरू केला आहे.
यातच लहान मुलांना देखील प्रचारात उतरवल्याचे प्रकार होत आहे. पण कायद्यानुसार त्याला मनाई आहे. विशेषत: पाच ते १४ वर्षांखालील मुलांना प्रचारात उतरवल्याचे दिसते आहे. यावर आता प्रशासन ऍक्शन मोडवर आलं आहे. थेट फौजदारी कारवाई करण्याचा, इशारा दिला आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये शालेय विद्यार्थी आणि विशेषत: पाच ते १४ वर्षांखालील मुलांचा महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्रासपणे वापर केला जात आहे. यात अनेक प्रमुख राजकीय पक्षांसोबत अपक्षांचाही समावेश आहे. निवडणूक आयोगाने तसं निरीक्षण देखील नोंदवलं आहे.
केंद्र सरकारच्या बाल आणि किशोरवयीन कामगार (प्रतिबंध आणि नियमन) कायदा, १९८६ (सीएलपीआर कायदा) नुसार, १४ वर्षांपेक्षा कमी वयाची कोणतीही व्यक्ती ही किशोरवयीन मुलगा म्हणून गणला जातो. यामुळे या वयातील मुलांना कोणत्याही घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक आदी कामांसाठी ठेवण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
तर असा प्रकार आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा करण्याच्या तरतूद यात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील विविध महापालिकांच्या प्रचारांमध्ये विविध राजकीय पक्षांकडून आपल्या प्रचाराचे वातावरण तयार करण्यासाठी १४ वयाखालील मुलांच्या हातात झेंडे दिले जात असल्याचे चित्र आहे.

