लातूर : प्रतिनिधी
राज्य शासनाने जुलै २०२४ मध्ये सुरु केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेत समावेश नसलेल्या जिल्ह्यातील साडेसात अश्वशक्तीवरील (एचपी) क्षमता असलेल्या १५ कृषीपंपधारक शेतक-यांनी ३ लाख ४५ हजार रूपयांचा वीजबील भरणा केला आहे. महावितरणच्या हाकेला साद देत थकीत वीजबिलांचा भरणा केल्याबद्दल या शेतक-यांचा महावितरणच्या वतीने सत्कार करण्यात आला.
लातूर जिल्ह्यामधे साडेसात अश्वशक्तीपर्यंत क्षमता असलेले १ लाख ४३ हजार ११ कृषीपंप वीजग्राहक असून मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजने अंतर्गत सुमारे ७७ कोटी ७० लाख रुपयांचे त्रैमासिक वीजदेयक माफ करण्यात येत आहेत, मात्र साडेसात अश्वशक्तीच्यावर क्षमता असलेल्या कृषीपंप वीजग्राहकांना मात्र मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेचा लाभ मिळत नाही. लातूर जिल्हयात ५.६ अश्वशक्ती ते १० अश्वशक्ती पर्यंत क्षमता असलेले १ हजार १०४ कृषीपंप वीजग्राहक असून १० अश्वशक्तीपेक्षा जास्त क्षमता असलेले २६४ कृषीपंप वीजग्राहक आहेत.
या सर्व ग्राहकांकडील वीजबील भरण्यासाठी महावितरण प्रत्यक्ष संवाद साधत प्रयत्न् करत होते. या प्रयत्नांना यश प्राप्त होत असून निलंगा विभागातील १३ शेतक-यांनी ३ लाख ३० हजार रूपयांचा वीज बील भरणा केला आहे. तर लातूर विभागातील २ शेतक-यांनी १५ हजार रूपयांचा भरणा केला आहे. याबद्दल महावितरणने वीजबील भरलेल्या शेतक-यांना धन्यवाद दिले असून पुष्पगूच्छ देवून सत्कारही केला आहे.
वीजखरेदी आणि प्रत्याक्ष वीजग्राहकांपर्यंत वीज पोहचवण्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी विकलेल्या विजेच्या प्रत्येक युनीटच्या बिलाची वसुली होणे अत्यावश्यक असून साडेसात एचपीच्यावर क्षमता असलेल्या कृषीपंपधारक शेतक-यांनी आपल्या वीजबीलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.