लातूर : प्रतिनिधी
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस ठाणे औसा हद्दीतील एमआयडीसी परिसरातील एका गोडाऊनमध्ये ठेवलेले शेतक-यांचे तब्बल १०० क्विंटल सोयाबीन चोरीला गेले होते. परंतु औसा पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीला गेलेले पूर्ण सोयाबीन अवघ्या २४ तासांत परत मिळाले.
लातूर जिल्ह्यातील औसा पोलिस ठाणे हद्दीत एमआयडीसीमधील गोडाऊनमधील ४ लाख ३९ हजार २०० रुपयांच्या १०० क्विंटल सोयाबीनची चोरी झाली होती. २०० कट्टे सोयाबीन दोन वाहनांमध्ये टाकून अज्ञात चोरटे पसार झाले होते. याबाबत तक्रार दाखल झाल्यावर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, (औसा)कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलिस ठाणे औसाचे पोलिस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वातील सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. सोयाबीन चोरणा-या चोरांबद्दल पोलिसांनी गुप्त माहिती मिळवून २०० कट्टे सोयाबीन आणि एक आयशर टेम्पो व एक बोलेरो जीप जप्त केले.
अभिषेक सुहास यादव (वय २१), वसवाडी, पाखरसांगवी, अभय अवधूत भोळे, (वय २२), मनोज राजू खताळ (रा. माऊली नगर) हे तिघे आरोपी लातूर जिल्ह्यातील पाखरसांगवी येथील असून चौथा आरोपी हनुमंत भैरवनाथ मुंडे (वय ३९ वर्षे, रा. टाकळी शिराढोण, जिल्हा धाराशिव) यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली असून चोरीस गेलेले सोयाबीन व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी चोरी झाल्यापासून अवघ्या चोवीस तासांत कारवाई करत चोरीला गेलेले सोयाबीन शेतक-यांना परत मिळवून दिले. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत असून चोरी गेलेल्या सोयाबीनची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ते परत केले जाणार आहे. सोयाबीनची चोरी करणा-या टोळक्याला बेड्या ठोकल्या असून २४ तासांतच चोरीचा माल हस्तगत करण्यात औसा पोलिसांना यश आले आहे.
सदरची कारवाई वरिष्ठ व औसा पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक महावीर जाधव, सहायक फौजदार कांबळे, पोलिस अंमलदार गुट्टे, मुबाज सय्यद तुमकुटे, चामे, पाटील, भंडे, मगर यांनी केली आहे.