नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताच्या विमान वाहतूक इतिहासात असे काही क्षण आहेत जे काळजाला हादरवणारे ठरले आहेत. तांत्रिक बिघाड, मानवी चूक, हवामानाची अनिश्चितता आणि धोकादायक रनवे अशा कारणांमुळे देशात अनेक वेळा भीषण विमान अपघात झाले आहेत. अहमदाबादमधील विमान अपघातानंतर पुन्हा एकदा अनेकांचे लक्ष गेल्या दशकभरात भारतात घडलेल्या मोठ्या अपघातांकडे वळले आहे. भारतातील मोठे प्रवासी विमानांचे अपघात…
१९९६ : हरियाणात विमानांची टक्कर, ३४९ ठार
हरियाणामध्ये दोन विमानांची टक्कर झाली. एक विमान सौदी अरेबियन एअरलाइन्सचे होते, तर दुसरे कझाकस्तानचे होते. भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विमान अपघात १२ नोव्हेंबर १९९६ रोजी घडला, जो चरखी दादरी विमान अपघात म्हणून ओळखला जातो. दोन्ही विमानांमधील सर्व ३४९ जणांचा मृत्यू झाला. पायलट आणि हवाई वाहतूक नियंत्रण यांच्यातील गैरसमज आणि उंची योग्यरित्या समजू न शकल्यामुळे हा अपघात झाला.
१९७८ : अरबी समुद्रात २१३ जणांचा मृत्यू
१ जानेवारी १९७८ रोजी, मुंबईहून उड्डाण केल्यानंतर लगेचच एक बोईंग ७४७ विमान अरबी समुद्रात कोसळले. दिशेबाबत गोंधळ आणि तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या या अपघातात २१३ जणांना आपला जीव गमवावा लागला. विमान मुंबईहून दुबईला जात होते.
२०१० : खड्ड्यात कोसळल्याने १५८ प्रवाशी ठार
कर्नाटकातील मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान धावपट्टीवरून घसरले, खड्ड्यात पडले आणि त्याचे दोन भाग झाले. २२ मे २०१० रोजी एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट ८१२ दुबईहून कर्नाटकला येत होती. विमानात १६६ लोक होते. लँडिंगच्या वेळी हवामान ठीक होते, परंतु धावपट्टी लहान होती आणि कमी उंचीवर बांधलेली होती. पायलटने विमान उशिरा उतरवले, ज्यामुळे ब्रेक लावण्यासाठी पुरेशी जागा उरली नाही. परिणामी, विमान धावपट्टीवरून आणखी घसरले आणि खड्ड्यात पडले. या अपघातात १५८ लोकांचा मृत्यू झाला.
१९९३ : संभाजीनगरात विमानाची ट्रकशी टक्कर
२६ एप्रिल १९९३ रोजी इंडियन एअरलाइन्सचे फ्लाइट ४९१ छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईला जात होते. विमानाने उड्डाण सुरू करताच धावपट्टीवर एक ट्रक आला. पायलटला वेळेत ट्रक दिसला नाही आणि विमान त्याच्याशी आदळले. टक्कर झाल्यानंतर विमानाला आग लागली आणि त्याचे तुकडे झाले. या अपघातात ५५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले.
२०२० : एअर इंडिया एक्सप्रेस कोसळले, २१ ठार
दुबईहून उड्डाण करणा-या फ्लाइट १३४४ मध्ये एकूण १८४ प्रवासी होते. ७ ऑगस्ट २०२० रोजी केरळमधील कोझिकोडे येथे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान धावपट्टीवरून घसरून कोसळले. यामध्ये २१ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ११० जण जखमी झाले. कोरोना काळात वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईहून भारतीयांना आणले जात होते.