धाराशिव : प्रतिनिधी
किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाचा वाद चांगलाच चिघळला आहे. या मुद्यावरून राज्यात दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीराजेंनंतर आता संभाजी ब्रिगेडने या वादात उडी घेतली आहे. एक मेपर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवावा असे अल्टिमेटम संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारला दिले आहे. राज्य सरकारने हे अल्टिमेटम पाळले नाही तर एक मेनंतर संभाजी ब्रिगेड पुन्हा एकदा रायगडावरील वाघ्या पुतळा हटवणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी दिला आहे.
छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. संभाजीराजेंच्या भूमिकेला राज्य सरकार काय प्रतिसाद देते याची आम्ही वाट पाहतोय. मराठा जोडो यात्रा संपल्यानंतर एक मे रोजी आम्ही स्वत: पुतळा काढणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. संभाजी भिडे वाघ्या कुत्र्याला ऐतिहासिक संदर्भ असल्याचा पुरावा देत आहेत पण त्यांचा पुरावाही आम्हाला मान्य नसून त्यांनी आमच्यासोबत चर्चेला यावे असे आव्हानही संभाजी ब्रिगेडने संभाजी भिडेंना दिले आहे. मराठा सेवा संघाची ‘मराठा जोडो’ यात्रा धाराशिव जिल्ह्यात आली असून यावेळी सौरभ खेडेकर यांनी हे वक्तव्य केले आहे.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवण्याला संभाजी भिडेंनी विरोध केला आहे. ‘संभाजीराजे भोसले बोलतात ते १०० टक्के चूक आहे,’ असे संभाजी भिडे म्हणाले आहेत. ‘वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचले आहे आणि ती कथा सत्य आहे,’ असा दावाही संभाजी भिडेंनी केला आहे. ‘वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे स्मारक म्हणून ते केले आहे. माणसे एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात. निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचे आहे. याचे द्योतक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथेच पाहिजे, असे संभाजी भिडेंनी म्हटले आहे.