बीड : प्रतिनिधी
एकवेळ टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. मात्र सद्यस्थितीला बाजारात टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अर्थात टोमॅटोची लाली फिकी पडली असल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. त्यानुसार विक्रीसाठी आणलेला टोमॅटो शेतक-यांनी रस्त्यावर फेकत त्यावर चालून लाल चिखल करत आंदोलन केले. तसेच सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
शेतक-याच्या मालाला भाव मिळत नसल्याचे नेहमीच पाहण्यास मिळत असते. सध्या भाजीपाल्याचे दर देखील खाली आल्याने भाजीपाला उत्पादक शेतक-यांना नुकसान सहन करावे लागत आहे. यातच मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. किरकोळ बाजारात पाच ते दहा रुपये प्रति किलो इतकाच दर मिळत असल्याने आर्थिक फटका बसत आहे.
दरम्यान बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टोमॅटोचा लाल चिखल करून सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतक-यांनी लक्षवेधी आंदोलन केले. लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोला सध्या पाच ते दहा रुपये प्रति किलो दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर २०० किलो टोमॅटोचा लाल चिखल करून लक्ष वेधण्यात आले. शेतक-यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.