नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. बदलत्या हवामानाचा मोठा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. २०२४ हे वर्ष जसे उष्ण राहिले, तसेच २०२५ हे नवीन वर्ष देखील सर्वात जास्त उष्ण ठरण्याची शक्यता आहे. जागतिक हवामान संघटनेने याबाबतचा इशारा दिला आहे.
या वर्षीदेखील विक्रमी तापमान दिसून येईल असा अंदाज जागतिक हवामान संघटनेने व्यक्त केला आहे. त्यामुळे हरितगृह वायूंची पातळी आणखी वाढू शकते. ज्यामुे भविष्यात आपल्याला अधिक उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. जागतिक हवामान संघटनेच्या मते, २०२४ नंतर २०२५ हे सर्वात उष्ण वर्षांपैकी एक असू शकते. त्याचा परिणाम जगभर दिसून येईल. युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, गेले एक दशक झाले आपण प्राणघातक उष्णतेतून जात आहोत. जे देश शांत आणि निरोगी भविष्यासाठी काम करत आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही उभे असल्याचे ते म्हणाले. जागतिक हवामान संघटनेचा संदर्भ देत गुटेरेस म्हणाले की, २०१५ ते २०२४ पर्यंतच्या हवामान बदलाने स्पष्ट संकेत दिले आहेत.
दरम्यान, या हवामान बदलाच्या स्थितीतून आपण बाहेर पडलो नाही, तर भविष्यातील परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशारा गुटेरेस यांनी दिला. त्यांच्या मते, २०२५ मध्ये अनेक देशांना उत्सर्जन कमी करावे लागेल आणि सुरक्षित मार्गाचा अवलंब करावा लागेल. ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी काम करावे लागेल. स्वच्छ आणि शाश्वत उर्जा स्त्रोतांकडे आपण वाटचाल करायला हवी असेही टोनियो गुटेरेस म्हणाले.