28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
HomeUncategorized२०२५ पर्यंत इस्रोच्या अवकाशात १२ मोहिमा

२०२५ पर्यंत इस्रोच्या अवकाशात १२ मोहिमा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) यंदा अनेक ऐतिहासिक मोहिमा फत्ते केल्या. यात चांद्रयान-३ ही सर्वात मोठी चांद्रमोहीम यशस्वी केली. या मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा जगातला पहिलाच देश ठरला. त्यापाठोपाठ आदित्य-एल १ हे अवकाशयान सूर्याच्या दिशेने पाठवले. त्यानंतर इस्रोने गगनयान मोहिमेची चाचणी यशस्वी केली आहे. आता इस्रो आणखी काही मोहिमा फत्ते करण्याच्या तयारीत आहे.

इस्रो पुढच्या दोन वर्षांमध्ये कोणकोणत्या मोहिमा राबवणार याबाबतची माहिती समोर आली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासावेळी केंद्र सरकारने पुढच्या दोन वर्षांतील इस्रोच्या मोहिमांची माहिती दिली. इस्रोने २०२४ आणि २०२५ साठी ज्या मोहिमा आखल्या आहेत, याबाबत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली. यापैकी निसार आणि गगनयान मोहिमेची बरीच चर्चा होत आहे.

इस्रोने २१ ऑक्टोबर रोजी गगनयान मोहिमेची पहिली उड्डाण चाचणी पूर्ण केली. गगनयान मोहिमेमधून मानव अवकाशात पाठवण्याची तसेच भविष्यात अवकाश स्थानक उभारले जाण्याची शक्यता आहे. गगनयान मोहिमेत आधी दोन मानवरहित उड्डाणे होतील. त्यानंतर भारतीय व्यक्तींना अवकाशाची सफर करण्याची संधी मिळेल. गगनयान प्रकल्प, मानवयुक्त अंतराळ मोहिमा फत्ते करण्याची भारताची क्षमता सिद्ध करेल. आतापर्यंत भारतासह अनेक देशांच्या अंतराळवीरांनी अवकाशवारी केली आहे. रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनीच स्वबळावर म्हणजेच स्वत:च्या रॉकेट/प्रक्षेपकाच्या मदतीने त्यांच्या अंतराळवीरांना अवकाशात पाठवले. या मानाच्या पंक्तीत भारतही जाऊन बसू शकतो. भारत स्वबळावर आपल्या नागरिकांना अवकाशात पाठवण्याची योजना आखत आहे. त्यादृष्टीने जोरदार तयारी सुरू असून, इस्रोने जगात भारत आता मागे नाही, हे अनेकदा सिद्ध करून दाखविले आहे.

दोन वर्षांतील या
मोहिमांची आखणी
गगनयान आणि निसारसह इस्रो पुढच्या दोन वर्षांमध्ये इनसॅट-३ डीएस, रिसॅट-१बी, रिसोर्ससॅट-३, टीडीएस०१, स्पॅडईएक्स, ओसिएनसॅट-३ ए, इड्रेस, जीसॅट-२० आणि एनव्हीएस-० या मोहिमा हाती घेणार आहे.

इस्रोचे केले अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोचे अभिनंदन केले. आतापर्यंत इस्रोने अनेक महत्त्वपूर्ण मोहिमा यशस्वी केल्या असून, आपल्या अंतराळ मोहिमांबाबत आपण एक मैलाचा दगड गाठला आहे. ज्यामध्ये २०४० पर्यंत एक भारतीय नागरिकाला चंद्रावर पाठवण्याच्या उद्देशाचादेखील समावेश आहे, असे पंतप्रधान म्हणाले. चांद्रयान-३ च्या मोहिमेत मोठे यश मिळविल्याबद्दल मोदींनी इस्रोचे अभिनंदन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR