लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात ५१ केंद्रांवर रविवार दि. ४ मे रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत नीटची परीक्षा पार पडली. जिल्ह्यातून २० हजार ८०१ विद्यार्थ्यांपैकी २० हजार ५८७ विद्यार्थी नीट परीक्षेला सामोरे गेले. तर २१४ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले. तसेच २ ते ५ या वेळेत पाल्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडून, रखरखत्या उन्हात झाडांच्या सावलीचा आधार घेत पालक उभा होते.
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत नीट-२०२५ ही परीक्षा ४ मे रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत असल्याने विद्यार्थी परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्रावर कांही तास आगोदर पोहचले. त्यामुळे लातूर शहरात सकाळपासूनच अनेक ठिकाणाहून विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचत असल्याने अनेक चौका-चौकात वाहतूकीची कोंडी दिसून आली. लातूर जिल्ह्यातून २० हजार ८०१ विद्यार्थी नीट परीक्षेला सामोरे जाणार असल्याने ५१ परीक्षा केंद्रांवर तयारी करण्यात आली होती. दुपारी २ ते ५ या वेळेत २० हजार ८०१ विद्यार्थ्यांपैकी २० हजार ५८७ विद्यार्थी नीट परीक्षेला सामोरे गेले. तर २१४ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले. सदरची परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त लावला होता.
तसेच सध्या उन्हाळयाचे दिवस असल्याने उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन आरोग्य विभागामार्फत प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्रथमोपचार साहित्यासह आरोग्य कर्मचारी नियुक्त केले होते. तसेचप्रत्येक परीक्षा केंद्रावर ओआरएस आणि पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात ठेवण्यात आली होती.