बीड : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश घेऊन भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. सरकार देशमुख कुटुंबीयांसोबत असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचे यावेळी अभिमन्यू पवार यांनी सांगितले. तसेच मतदारसंघामध्ये जमा झालेला २१ लाख रुपयांचा निधी त्यांनी देशमुख कुटुंबीयांना सुपूर्द केला.
संतोष देशमुख प्रकरणात राज्य सरकार जे पाऊल उचलत आहे त्याची माहिती अभिमन्यू पवार यांनी दिली. त्यावर देशमुख कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. पण काही बाबतीत देशमुख कुटुंबीयांना प्रश्न आहेत, त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाणार असल्याचे अभिमन्यू पवार यांनी सांगितले. देशमुख कुटुंब यांच्या नव्या मागण्या आहेत, त्यावर नक्कीच विचार केला जाईल. सरपंच देशमुख यांची हत्या नसून ती माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट घडली आहे. उज्वल निकम यांच्यावर महाराष्ट्राचा विश्वास आहे. त्यांच्या तावडीतून आरोपी सुटणार नाहीत. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा दिली जाईल, असेही पवार म्हणाले.
अजित पवारांचीही घेतली भेट
दरम्यान, बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. अमरसिंह पंडित यांच्या शिवछत्र या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली. गेल्या तीन महिन्यांतील प्रशासनाच्या गोंधळाबाबतची माहिती देशमुखांनी अजित पवारांना दिली. यावेळी जिल्हा न्यायालयातील आरोपींच्या हाणामारीबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. धनंजय देशमुख प्रकरणाच्या तपासामध्ये अनेक उणिवा राहिल्या असून त्याचा पुन्हा एकदा तपास करण्यात यावा अशी मागमी धनंजय देशमुखांनी अजित पवारांकडे केली असल्याची माहिती आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींना बीडसोडून इतरत्र हलवण्याच्या मागणीसह इतर मागण्यांचा मसुदा धनंजय देशमुखांनी अजितदादांना दिला.