विरार : विरार (पश्चिम) येथील एका गगनचुंबी इमारतीत बुधवारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. केवळ सात महिन्यांचे बाळ आईच्या हातून २१व्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाला ताप होता आणि बरे वाटल्यानंतर आई त्याला डॉक्टरकडून आणत होती. घरी आल्यानंतर पाहुणे भेटायला आले होते, आणि बाळाला खांद्यावर घेत असताना आईचा तोल जाऊन बाळ तिच्या हातातून निसटले.
या घटनेत बाळाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, या दाम्पत्याला सात वर्षांनंतर अपत्यप्राप्ती झाली होती. सध्या पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे. सात वर्षांनी अपत्यप्राप्ती झालेल्या दाम्पत्याचा आनंद अवघ्या सात महिन्यांत दु:खात बदलला. मंगळवारी बाळ आजारी होते, बुधवारी त्याची तब्येत सुधारल्यावर आईने त्याला खांद्यावर घेऊन उचलले, पण अचानक तिची तब्येत बिघडली आणि बाळ हातातून निसटून थेट २१व्या मजल्यावरून खाली पडले.
नातेवाईक घरी होते आणि ही घटना त्यांच्या समोरच घडली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश काळे यांनी सांगितले की, संबंधित महिलेला चक्कर आल्याने बाळ खाली पडले. या प्रकरणी विरार पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.