वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २२७ वर्षे जुना कायदा आणण्याच्या तयारीत आहेत, ज्यामुळे प्रत्येक गैर-अमेरिकन व्यक्तीला देशाबाहेर काढले जाण्याचा धोका आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हा कायदा लागू केल्यास अमेरिकेसह संपूर्ण जगात खळबळ उडेल.
अमेरिकेचा हा २२७ वर्ष जुना कायदा सांगतो की, जेव्हा जेव्हा अमेरिका आणि इतर कोणत्याही देशामध्ये युद्ध होईल तेव्हा राष्ट्राध्यक्षांना गैर-अमेरिकन वंशाच्या लोकांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असेल. विशेषत: ते १४ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांबाबत निर्णय घेऊ शकतात आणि त्यांना देशातून हद्दपारही केले जाऊ शकते. या कायद्यानुसार बाहेर काढल्या जाणा-या लोकांना ‘शत्रू एलियन’ घोषित केले जाऊ शकते.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुन्हा एकदा सामान्य परिस्थितीत १८ व्या शतकातील हा कायदा लागू करू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेत याची जोरदार चर्चा आहे. मात्र, अमेरिकेवर कोणत्याही देशाकडून हल्ला झालेला नसताना ट्रम्प यांना या कायद्याची अंमलबजावणी करणे कठीण जाईल, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. २०२४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यानंतर अवैध स्थलांतरितांना देशातून बाहेर काढू, असे अनेकवेळा सांगितले होते. याशिवाय त्यांनी एलियन एनिमीज कायदा लागू करण्याची घोषणाही केली होती.
चौकट
४५ कोटी द्या, अमेरिकन बना!
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या कंपन्यांना निर्देश देत स्थानिक विद्यापीठातून गोल्ड कार्ड नागरिकत्वासह भारतीय पदवीधरांना नोकरीवर ठेवा अशा सूचना दिल्या आहेत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या रूपाने इमीग्रेशन इनीशियेटिव्ह सुरू करत गोल्ड कार्डची घोषणा केली आहे. ज्यातून ५० लाख डॉलरमध्ये कुणीही अमेरिकेचे नागरिकत्व घेऊ शकते. या नवीन योजनेतून जगभरातील उच्चभ्रू श्रीमंत वर्गाला अमेरिकेकडे आकर्षिक करणे हा त्यामागचा हेतू आहे. त्यातून जास्तीत जास्त महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट ट्रम्प सरकारचे आहे. भारतीय चलनात ४५ कोटी रूपयात अमेरिकेचे नागरिक बनू शकतात. पदवीधर विद्यार्थी अमेरिकेत शिकून भारतात परतायचे. भारतात जाऊन ते कंपनी उघडतात, अब्जाधीश बनतात आणि तिथल्या हजारो लोकांना रोजगार देतात असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेत भारत, चीन, जपान आणि वेगवेगळ्या देशातून येतात. ते हार्वर्ड किंवा द व्हार्टन स्कूल ऑफ फायनान्समधून शिक्षण पूर्ण करतात. भारतीय विद्यार्थी त्यांच्या देशात जाऊन मोठ्या कंपन्या उघडतात आणि अब्जाधीश बनतात असे ट्रम्प यांनी सांगितले.