लातूर : प्रतिनिधी
लातूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात एकूण २४ ठिकाणी ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. कर्नाटक राज्यातून येणा-या सर्व गाड्यांची तपासणी केली जात आहे. आंतरराज्य सीमेवरील महाराष्ट्र-कर्नाटक राज्याला जोडणा-या रस्त्यावरील शिरोळ- जानापुर, तादलापूर, औराद शहाजानी, तोगरी, बोंबळी, ममदापूर मोड या ठिकाणी नाकाबंदी व चेकपोस्ट तयार करण्यात आली आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या चेकपोस्ट/ नाकाबंदी पॉईंटवर केंद्रीय दलाचे जवान, लातूर पोलीस, तसेच निवडणूक आयोगाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले असून सर्व वाहनांची कसून चौकशी व तपासणी करत आदर्श आचारसंहिता राबवत आहेत. आंतरराज्य चेकपोस्ट, नाकाबंदी सोबतच आंतरजिल्हा ९ ठिकाणी लातूर-धाराशिव हद्द, कानडे बोरगाव, कळब रोड, पळशी फाटा, पानगाव, सांगवी फाटा, टोल नाका किनगाव, जांब जळकोट, बेलकुंड, किल्लारी येथे नाकाबंदी/चेकपोस्ट लावण्यात आलेले आहेत.
तर जिल्हातंर्गत बारा नंबर पाटी, हरंगुळ, कळंब रोड, महाराणा प्रताप नगर, बाभळगाव रोड, हडोळती,आष्टा मोड, शिरशीमोड निलंगा, आरी मोड कासारशिरशी या ९ ठिकाणी नाकाबंदी/चेकपोस्ट तयार करण्यात आले असून लातूर शहरात येण्यासाठी असणारे प्रमुख मार्ग आहेत त्या प्रमुख मार्गांवर नाकाबंदी चेकपॉइंट तयार करण्यात आली आहेत. विधानसभा निवडणूक अनुषंगाने निवडणूक आयोगाचे अधिकारी कर्मचारी, केंद्रीय दलाचे ३०० जवानासोबतच लातूर पोलीसचे अधिकारी/अमलदार व एक कॅमेरामन असा फौजफाटा तैनात आहे. बाहेरून येणा-या गाड्यांची कसून चौकशी केली जातेय.