श्रीरामनगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम
अयोध्या : वृत्तसंस्था
प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत आज भव्य-दिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. नवव्या दीपोत्सवाच्या निमित्ताने राम की पैडी आणि शरयू नदीच्या ५६ घाटांवर तब्बल ३६ लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले. यासह अयोध्येने पुन्हा एकदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम नोंदविला.
मागील वर्षीचा विक्रम २६ लाख ११ हजार १०१ दिव्यांचा होता. यावर्षी तो मोडित काढत २६ लाख १७ हजार २१५ दिव्यांनी रामनगरी उजळून निघाली. या विक्रमाची नोंद करण्यासाठी गिनीज बुकची टीम अयोध्येत दाखल झाली होती. अयोध्येतील प्रत्येक चौक, रस्ता आणि मंदिर पुष्प, प्रकाश आणि रांगोळ््यांनी सजलेले होते. सर्वत्रत जय श्रीरामचा जयघोष घुमत होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पक विमानाच्या प्रतिकात्मक स्वरूपात श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाच्या मूर्तीचे स्वागत केले. यानंतर रामकथा पार्कच्या मंचावर श्रीरामाचा राज्याभिषेक करण्यात आला. भरत मिलापाचे दृश्य साकारले गेले आणि संपूर्ण परिसर जय श्रीरामच्या जयघोषाने दुमदुमला. या भव्य दीपोत्सवासाठी ३३ हजार स्वयंसेवकांनी मागील काही महिन्यांपासून तयारी केली होती. अवध विद्यापीठ आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण शरयू तटावर दिवे लावण्यात आले.