नवी दिल्ली : मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर हुसेन राणाला अखेर भारतात आणण्यात आले. त्याला घेऊन येणारे खास विमान आज दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले. यानंतर त्याला विमानतळावरुन थेट राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मुख्यालयात नेले जात आहे. तिथे तपास संस्थांच्या पथकाकडून त्याची चौकशी केली जाईल.
तहव्वुर राणा अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहत होता. लष्कर-ए-तैयबा आणि डेव्हिड हेडलीशी संबंध असल्याने भारत गेल्या अनेक वर्षांपासून राणाच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत होता. आता अखेर या प्रयत्नांना यश आले अन् राणा भारतात दाखल झाला. अमेरिकेतून आलेले विशेष विमान दिल्ली विमानतळावर दाखल होताच राणाला एनआयएने अटक केले. यानंतर त्याला एनआयए मुख्यालयात नेले जात असून, तिथे त्याची चौकशी केली जाईल. यानंतर तहव्वुर राणाला तिहार तुरुंगात ठेवण्यात येणार आहे.
पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया
तहव्वुर राणा हा पाकिस्तानी लष्कर/आयएसआयचा सदस्य आहे. त्याची २६/११ हल्ल्याच्या कटात थेट होती. दरम्यान, आता राणाच्या प्रत्यार्पणाबाबत पाकिस्तानकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानने तहव्वुर राणापासून स्वत:ला दूर केले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने एका निवेदनात म्हटले की, “तहव्वुर राणाने गेल्या दोन दशकांत त्याच्या पाकिस्तानी कागदपत्रांचे नूतनीकरण केलेले नाही, त्यामुळे त्याचे कॅनेडियन नागरिकत्व अगदी स्पष्ट आहे.
२६/११ हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू
तहव्वुर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक असून, २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या अमेरिकन नागरिक डेव्हिड कोलमनचा निकटवर्तीय होता. २६ नोव्हेंबर २००८ रोजी १० पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या गटाने मुंबईतील रेल्वे स्टेशन, दोन हॉटेल्सवर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह एकूण १६६ लोक मारले गेले होते. त्याच प्रकरणात नोव्हेंबर २०१२ मध्ये पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला पुण्याच्या येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली.