29.4 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeमहाराष्ट्र२७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर

२७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर

शरद पवार, अजित पवार, पटेल आणि भुजबळही साथ साथ

मुंबई : प्रतिनिधी
तुकाराम धुवाळी यांच्या निधनानंतर त्यांच्या श्रद्धांजली सभेत शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते एकत्र येत आहेत. उद्या संध्याकाळी ही शोकसभा होणार आहे. यावेळी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबात वितुष्ट आले होते. पवार कुटुंबातील काही सदस्यांनी तर एकमेकांच्या विरोधातही निवडणुका लढवल्या होत्या. यावरून पवार कुटुंबात काहीच अलबेल नसल्याचे बोलले जात होते. आता तर उद्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अख्खी राष्ट्रवादीच एका मंचावर येणार आहे. पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्व नेते एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत.

शरद पवार यांचे स्वीय सहायक तुकाराम धुवाळी यांचे नुकतेच निधन झाले आहे. शरद पवार यांना सुरुवातीपासूनच धुवाळी यांनी साथ दिली होती. धुवाळी यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांकडून शोक व्यक्त केला गेला. धुवाळी यांचे दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. धुवाळी यांचे निधन झाल्याने त्यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दुपारी ४.३० ते सायं ६.३० वाजेपर्यंत वाय. बी. सेंटर येथे ही शोकसभा पार पडणार आहे.

तुकाराम धुवाळी हे शरद पवार यांचे अत्यंत जुने सहकारी आणि स्वीय सहायक होते. शरद पवार हे गेल्या ६० वर्षांपासून राजकारणात आहेत. तर धुवाळी यांनी १९७७ पासून म्हणजे पवार यांना ५३ वर्षे साथ दिली आहे. अखेरच्या श्वासापर्यंत धुवाळी हे शरद पवार यांची सावली बनून राहिले होते.

पहिल्यांदाच एकत्र येणार
या शोकसभेच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादीचे प्रमुख नेते एकत्र येणार आहेत. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. सोबतच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील आदी नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर दिसणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR