लातूर : प्रतिनिधी
जिल्हयात रब्बी हंगाम २०२४-२५ साठी हमीभावाने हरभरा खरेदीसाठी नाफेडच्यावतीने १९ खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले. या खरेदी केंद्राच्या ऑनलाईन पोर्टलवर हरभरा विक्रीसाठी १ हजार ७८ शेतक-यांनी नोंदणी केली आहे. अशा ९९२ शेतकरयांना खरेदी केंद्रांच्याकडून हरभरा खरेदीसाठी एमएमएस पाठवले आहेत. त्यापैकी दोन केंद्रावरील २९ शेतक-यांनी ४६७ क्विंटल हरभरा विक्रीसाठी आणला. हरभरा नोंदणीसाठी ३० मे पर्यंत मुदत आहे. मात्र आडत बाजारात हरभ-याला ब-यापैकी भाव मिळत असल्याने शेतकरी हमीभाव खरेदी केंद्राकडे जाण्यास फारसे उत्सूक दिसत नाहीत.
लातूर जिल्हयात गेल्यावषी ८८०.२० मिमी म्हणजेच तो वार्षीक सरासरीच्या १११ टक्के पाऊस झाल्यामुळे ३ लाख २९ हजार ९०४ हेक्टर क्षेत्रावर रबीचा पेरा झाला होता. यात ज्वारीचा २१ हजार २४६ हेक्टरवर, गहू ११ हजार १९४ हेक्टर, मका १ हजार २०५ हेक्टर, हरभरा २ लाख ७३ हजार ९२३ हेक्टर, करडई १० हजार ५७७ हेक्टर, सुर्यफूल ५२ हेक्टर, जवस ७८ हेक्टर, तीळ, भुईमूग, लहान कारळे आदी पिकांचा पेरा झाला होता.
हरभ-याच्या काढणी नंतर आडत बाजारात मोठया प्रमाणात आवक सुरू आहे. आडत बाजारात हरभ-याला ५ हजार ५०० ते ५ हजार ७०० रूपयांच्या आसपास दर मिळत आहे. तर नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर हरभ-याला ५ हजार ६५० हमीभाव आहे. तर लातूरच्या आडत बाजारात व हमीभाव खरेदी केंद्रावर १०० ते २०० रूयांचा फरक आहे. शेतक-यांना हरभ-याच्या हमी भावाचा लाभ व्हावा म्हणून केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत लातूर जिल्हयात नाफेडच्यावतीने १९ खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या ठिकाणी शेतक-यांना ३० मे पर्यंत नोंदणी करता येणार आहे. हरभरा खरेदीसाठी १ मे पासून सुरू झाली असून ती २९ जून पर्यंंत चालणार आहे. या केंद्रावर आज पर्यंत १ हजार ७८ शेतक-यांनी नोंदणी केली आहे.