लातूर : दोन गावठी कट्टयासह एका १७ वर्षीय मुलाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लातुरात पकडले. त्याच्याकडून २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लातुरात गावठी कट्टा बाळगणारा एक अल्पवयीन मुलगा फिरत असल्याची माहिती खब-याने पोलिसांना दिली. या माहितीची पडताळणी केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने लातुरातील गांधी मार्केट परिसरात सापळा रचला. दरम्यान, एका संशयीत १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करून झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे २ गावठी कट्टे (पिस्टल), जिवंत काडतुसे आढळून आली.
ताब्यातील मुलगा मांजरी (ता.जि. लातूर, सध्या रा. वारजे माळवाडी, पुणे) गावचा रहिवासी आहे. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलासह व्यंकटेश ऊर्फ विकी शिवशंकर अनपुरे (रा. सहयोग नगर, वारजे माळवाडी, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. व्यंकटेश हा गुन्हा घडल्यापासून पसार आहे. तपास गांधी चौक ठाण्याचे पोलिस करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, पोउपनि. राजेश घाडगे, माधव बिलपटे, तुराब पठाण, नवनाथ हासबे, पाराजी पुठ्ठेवाड, युवराज गिरी, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, मोहन सुरवसे, नकुल पाटील यांच्या पथकाने केली आहे.