गडचिरोली : प्रतिनिधी
भामरागडचे माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी यांच्या हत्या प्रकरणासह दिरंगी-फुलनार जंगलात चकमकीत सी-६० जवान महेश नागुलवार या जवानाचा बळी घेताना झालेल्या चकमकीत सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना पोलिसांनी आरेवाडा जंगलात अटक केली. ५ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली.
कंपनी क्र. १० चा प्लाटून पार्टी कमिटी मेंबर केलू पांडू मडकाम उर्फ दोळवा (२६,रा. मुरकुम ता. उसूर जि. बिजापूर, छत्तीसगड) व भामरागड दलमची सदस्य रमा दोहे कोरचा उर्फ डुम्मी (३२, रा. मेंढरी ता. एटापल्ली) अशी त्यांची नावे आहेत. त्या दोघांवर शासनाचे ८ लाखांचे बक्षीस होते. छत्तीसगड सीमेवरील कियेर येथे माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी (४७) यांची १ फेब्रुवारीला गळा दाबून हत्या करत नक्षलवाद्यांनी त्यांच्या मृतदेहावर पत्रक सोडले होते. तसेच ११ फेब्रुवारी रोजी दिरंगी-फुलनार जंगलात पोलिस व नक्षलवाद्यांत चकमक झाली होती. यात महेश नागुलवार या जवानाने प्राणाची आहुती दिली होती. या दोन्ही प्रकरणांत या दोन्ही जहाल नक्षल्यांचा हात होता. त्यांना मोठ्या शिताफीने जेरबंद केले.
विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, उप-महानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, राज्य राखीव दलाचे २७ बटालियनचे कमांडंट दाओ इंजिरकान कींडो, अपर अधीक्षक यतीश देशमुख, एम. रमेश, उपअधीक्षक विशाल नागरगोजे व अमर मोहिते यांच्या मागर्दशनाखाली ही कारवाई केली.