32 C
Latur
Thursday, April 3, 2025
Homeमहाराष्ट्र२ ते ४ मेदरम्यान महाबळेश्वर पर्यटन महोत्सव

२ ते ४ मेदरम्यान महाबळेश्वर पर्यटन महोत्सव


मुंबई (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे यंदा प्रथमच महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५ आयोजित करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यटन महोत्सव २ ते ४ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत २ मे २०२५ रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी दिली.

सातारा जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात पर्यटन महोत्सव होत आहे. या महोत्सवात पर्यटकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाबळेश्वरमधील प्रसिद्ध वेण्णा तलावात महोत्सव कालावधीत नेत्रदीपक लेझर शो होणार आहे. गुजरातमधील कच्छ रणच्या धर्तीवर महाबळेश्वर येथे शंभरहून अधिक टेन्ट्स उभारण्यात येणार आहेत. पर्यटकांसाठी अत्याधुनिक निवास व्यवस्थेसाठी टेंट सिटी उभारली जाणार आहेत. वेण्णा तलावात पर्यटकांना साहसी खेळ आणि वॉटर स्पोर्टसचा आनंद घेता येईल. देशभरातील पर्यटन उद्योगातील तज्ज्ञ, ट्रॅव्हल एजंट्स आणि गाईड्स यांचा एक विशेष परिसंवाददेखील आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती देसाई यांनी दिली.

महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून या महोत्सवात सहभागी झालेल्या उद्योजक, ट्रॅव्हल गाईड्स आणि स्थानिक कलाकारांचा यथोचित सत्कार केला जाणार आहे. महाबळेश्वर येथे पर्यटनाच्या दृष्टीने प्रथमच महोत्सव होत असून, याला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. पर्यटकाच्या दृष्टीने या महोत्सवाचे विशेष महत्त्व आहे. याला मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

पारंपरिक खाद्य
संस्कृतीचा आस्वाद
महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि पर्यटनदृष्ट्या त्यांचे योगदान यावर विशेष सादरीकरणदेखील होणार आहे. ३ मे २०२५ रोजी महाबळेश्वरच्या साबळे रोड येथे एक विशेष सांस्कृतिक मिरवणूक काढण्यात येईल. या महोत्सवात राज्यातील प्रत्येक भागातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद पर्यटकांना घेता येईल, असेही त्यांनी सांगितले.

लोककला, ड्रोन शोने सांगता
४ मे २०२५ रोजी समारोप सोहळ्यापूर्वी महाराष्ट्रातील विविध पारंपरिक लोककला जसे की लावणी, गोंधळ, जागर, नाशिक ढोल इत्यादींचे सादरीकरण होणार आहे. तसेच भव्य ‘ड्रोन शो’ या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR