जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीची मुदत संपून सहा महिन्याच्या वर कालावधी झाला आहे. ज्या ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्या होत्या अशा ग्रामपंचायतीमध्ये संबंधित सरपंच यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती मात्र आता शासनाने ग्रामपंचायतीवर अधिकारी स्तरावरील प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे .
जळकोट तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र या २७ ग्रामपंचायतीचा कारभार आता केवळ दोन प्रशासक पाहणार आहेत. या दोन प्रशासकांना वाटून ग्रामपंचायती देण्यात आलेल्या आहेत. तालुक्यातील रावणकोळा, हाळदवाढवणा, पाटोदा खुर्द, तिरुका, घोणसी, डोंगरगाव, अतनूर, मरसांगवी, गव्हाण, धामणगाव, गव्हाण, येलदरा, चिचोली, सुल्लाळी, एकुगा खुर्द, बोरगाव खुर्द, विराळ, कोळनूर, शेलदरा, वांजरवाडा, वडगाव, बेळसांगवी, सोनवळा, कोनाळी डोंगर, लाळी बु., कुणकी, मेवापूर, शिवाजीनगर तांडा या २७ ग्रामपंचायतीवर आता सरपंच ऐवजी प्रशासक काम पाहणार आहेत.
जळकोट पंचायत समितीचे पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी जयवंत कोनाळे व जळकोट पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी के.पी. बिरादार यांच्याकडे २७ ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता या दोन अधिका-यांना या २७ ग्रामपंचायतीमध्ये दररोज पोहोचणे शक्य होईल का? नागरिकांच्या अडीअडचणी सोडविणे शक्य होईल का ? असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.
















