मुंबई : प्रतिनिधी
मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने धक्का दिला आहे. मंत्री मुंडे यांच्यावर पत्नी करुणा शर्मा-मुंडे यांना कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. हे सर्व आरोप न्यायालयाने मान्य करत मुंडेंनी करुणा शर्मा-मुंडेंना दरमहिन्याला २ लाख रुपयांची पोटगी द्यावी, असे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर हिंसाचाराच्या घटना सांगताना करुणा शर्मा-मुंडे यांना रडू कोसळले आहे.
करुणा शर्मा-मुंडे म्हणाल्या, तीन वर्षांपासून मी लढा देत आहे. मी न्यायालय, वकील गणेश कोल्हे यांचे आभार मानते. पण, न्यायालयाने २ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतलाय, त्यावर मी समाधानी नाही. एका नोकराच्या नावावर ४ हजार कोटींची संपत्ती निघाली आहे. मात्र, आमच्या नावावर एक रुपयाची संपत्ती नाही.’ माझा मुलगा २१ वर्षांचा असून तो बेरोजगार आहे. आमचा महिन्याचा खर्च पाहता १५ लाख रुपये मिळाले पाहिजेत. याबद्दल मी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, असे करुणा शर्मा-मुंडे यांनी सांगितले.
घरगुती हिंसाचार प्रकरणी तुम्ही कोणते आरोप केले होते? असा प्रश्न विचारल्यावर करुणा शर्मा-मुंडे म्हणाल्या, माझ्या आईने आत्महत्या केली होती. मला तीन वर्षांपासून त्रास दिला जातोय. दोनवेळा मला तुरुंगात टाकण्यात आले. येरवड्यासारख्या तुरुंगात ४५ दिवस, तर बीडमधील तुरुंगात १६ दिवस ठेवण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिक कराडने मला मारहाण केली. माझी कार फोडली. माझ्या बहिणीवर शारीरिक अत्याचार करण्यात आला.
दोन लाख रुपयांच्या पोटगीत मी समाधानी नाही. धनंजय मुंडे यांनी तडतोड करण्यासाठी प्रयत्न केले. माझ्या मुला-मुलीचे शिक्षण थांबले आहे. मला आत्महत्येचा विचार आला होता. पण, मी आत्महत्या केल्यावर माझ्या मुलांना कोण सांभाळणार? याचा विचार करून मी जिवंत आहे. परंतु, असेच सुरू राहिले, तर मी सुद्धा माझ्या आईसारखी आत्महत्या करेन, असे म्हणत करुणा शर्मा-मुंडे यांना रडू कोसळले.
मी अनेकवेळा मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. मात्र, भेटण्यासाठी वेळ दिला जात नाही. या लोकांना काही पडलेले नाही. वाईट लोकांना फक्त यांना मोठे करायचे आहे. वाल्मिक कराडजवळ चार हजार कोटींची संपत्ती मिळाली. परंतु, धनंजय मुंडे यांचा मुलगा सिशिव हा मुंडे घरण्याचा एकमेव वारस आहे. सिशिव बेरोजगार आहे. वाल्मिक कराडच्या मुलाकडे १ कोटीची कार आहे. मुलगी ट्रेन आणि टॅक्सीमध्ये फिरते, असे करुणा शर्मा-मुंडे यांनी सांगितले.
ठेवलेली बाई नसून मुंडेंची पहिली पत्नी
मी ठेवलेली बाई नाही, मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे. हीच माझी लढाई होती आणि आज त्याचाच विजय झाला आहे. मला भारतातील महिलांना एकच सांगायचं आहे की, समोरचा मोठा माणूस आहे, मंत्री, पैसेवाला हे पाहून शांत बसू नका. मी लढाई सुरू केली तेव्हा एक रुपया नव्हता. घर कर्जात होतं. माझी गाडी उचलण्यात आली. आमच्याकडे घराचे हप्ते भरण्यासाठी पैसे नव्हते, असेही त्या म्हणाल्या.
माझ्या लढ्याला यश
आज माझ्या घरात या निर्णयावर व्यक्त होण्यासाठी कोणी नाही. आई होती तिचे निधन झाले आहे. महिलांचा लढा खूप मोठा असतो. मी गेल्या ३ वर्षांपासून एकटी लढत आहे. माझ्याकडे पैसे नव्हते, माझे सगळे दागिने विकले आहेत. माझी फार अवघड परिस्थिती होती. बीडवरून मुंबईला येणं आणि बीडला जाणं, हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.