34 C
Latur
Sunday, May 11, 2025
Homeमहाराष्ट्र२ शिवसेना, २ कार्यक्रम, बुधवारी ५८ वा वर्धापन दिन

२ शिवसेना, २ कार्यक्रम, बुधवारी ५८ वा वर्धापन दिन

बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आम्हीच : शिंदे
फुटिरांनी वर्धापन दिन साजरा करू नये : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी
मराठी माणसांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचा बुधवारी ५८ वा वर्धापन दिन असून या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाने दोन स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आम्हीच पुढे नेत आहोत, अशी भूमिका मांडत एकनाथ शिंदे यांनी या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी चालवली आहे तर उद्धव ठाकरे गटाचा कार्यक्रम षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे.

बुधवारी शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे अधिकृत नाव आणि चिन्हं शिंदेंच्या शिवसेनेला दिले आहे. लोकसभा निवडणुकीत लोकांनी दोघांनाही संमिश्र कौल दिला आहे. त्यामुळे आम्हीच स्व. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराचे वारसदार असल्याचा दावा करीत शिंदे यांच्या शिवसेनेने वर्धापन दिनाचे जोरदार आयोजन केले आहे. रेसकोर्सजवळील एनएसआय संकुलात त्यांचा वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे. दादर ते वरळीपर्यंत सर्वत्र झेंडे लावण्यात आले आहेत. ‘वाघाने वाघासारखं वागावं भगवं आहे रक्त गर्वाने सांगावं’, असा मजकूर असलेले फलक सगळ्यांचे लक्ष वेधत आहेत. ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा सायन येथील षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे
२३ जानेवारीला लोकार्पण
उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला भेट देऊन तेथील बांधकामाची पाहणी केली. दादर येथील महापौर निवासस्थानच्या जागेत उभारण्यात येणारे हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जुलै महिनाअखेरपर्यंत बांधकाम पूर्ण होऊन ऑगस्टमध्ये स्मारकातील इंटीरियरच्या कामाला सुरुवात होणार आहे. सर्व कामे युद्धपातळीवर सुरू असून बाळासाहेबांच्या जयंतीला म्हणजेच २३ जानेवारी रोजी स्मारक सर्वसामान्य जनतेसाठी खुले करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR