27.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeअंतरराष्ट्रीय३०३ भारतीय प्रवाशांसह फ्रान्सने विमान रोखले

३०३ भारतीय प्रवाशांसह फ्रान्सने विमान रोखले

पॅरिस : भारतीय नागरिकांना घेऊन निकाराग्वाला जाणारे विमान फ्रान्सने रोखले आहे. या विमानात ३०३ भारतीय नागरिक होते. या विमानाचा मानवी तस्करीसाठी वापर केला जात असल्याचा संशय फ्रेंच यंत्रणांना आहे. एका निनावी सूचनेवरून हे विमान ताब्यात घेण्यात आल्याचे फ्रेंच अधिका-यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले असताना ही घटना समोर आली आहे. मॅक्रॉन यांनी स्वत: ट्विट करून हे निमंत्रण स्वीकारल्याची माहिती दिली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी नकार दिल्यानंतर मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण पाठवण्यात आले.

भारतातून निकाराग्वाला जाणारे विमान मानवी तस्करीसाठी वापरले जाऊ शकते. या विमानाने संयुक्त अरब अमिरातीहून उड्डाण घेतले होते. या प्रवाशांच्या प्रवासाची परिस्थिती आणि हेतूंबाबत न्यायालयीन चौकशी सुरू झाल्याची माहिती फ्रेंच अधिका-यांनी दिली आहे. मानवी तस्करीच्या संशयावरून अधिकारी तपास करत होते.

दुबईहून उड्डाण घेतलेल्या रोमानियन चार्टर कंपनीच्या विमानाचा वापर करण्यात आला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर ते तांत्रिक थांबण्यासाठी छोट्या वॅट्री विमानतळावर उतरवण्यात आले. या ठिकाणी आता प्रवाशांची थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या विमानातील भारतीय नागरिकांना आणखी किती दिवस ठेवण्यात येईल किंवा त्यांना भारतात पाठवण्याची तयारी आहे का, हे फ्रेंच अधिका-यांनी अद्याप सांगितलेले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR