मुंबई : प्रतिनिधी
महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ विविध कारणांमुळे सतत चर्चेत असते. अशातच आता या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
ती म्हणजे या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर म्हणजेच ३० एप्रिल रोजी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेचा सण लाडक्या बहिणींसाठी गोड होणार आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून ते निकाल लागल्यानंतर राज्यातील राजकारण या योजनेभोवती फिरत होते. आजही या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. सरकारने निवडणुकीआधी सरसकट महिलांना योजनेचा लाभ दिला आणि सत्ता येताच अर्ज पडताळणी लागू करत बहिणींचा विश्वासघात केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो.
मात्र, एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की कमी होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.कारण सरकारने लागू केलेल्या अर्ज पडताळणीचा फटका आतापर्यंत अनेक बहिणींना बसला आहे. त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा हप्ता मार्च महिन्याचा लाभ मिळालेल्या सर्व महिलांना मिळणार का? याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना जुलै २०२४ पासून लागू केली आहे. ही योजना महायुतीसाठी विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली. मात्र, निवडणुकीनंतर राज्य सरकारने अनेक महिलांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याच्या तक्रारी आल्यामुळे अर्ज पडताळणी सुरू केल्याचे जाहीर केले.
त्यानुसार आता अपात्र महिलांना या योजनेचा लाभ देणे बंद करण्यात आले आहे. महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेसाठी अर्ज केलेल्यांपैकी जवळपास ११ लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.