लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात गेल्या अकरा दिवसांपासून अवेळी पाऊस पडत आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाटा आणि वादळी वा-यासह जोरदार पाऊस पडत आहे. मे महिन्यातील या पावसाचा जिल्ह्यातील शेती पिकांचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील ३४.७ हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात सर्वाधिक लातूर व चाकुर तालुक्यातील शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.
सलग आणि जोरदार पावसाने संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे, बंधारे, बराजेस वाहते झाले असून विहिरी, तलाव, मोठे, मध्यम, लहान प्रकल्प तुडूंब भरले आहेत. या पावसाचा फटका लातूर तालुक्यातील ३ हेक्टर बागायत, ३.५ हेक्टर फळपीक, असे एकुण ६.५ हेक्टर शेत जमिनीला बसला आहे. तर सर्वाधिक चाकुर तालुक्यातील २८.२ हेक्टर फळपीक शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या पावसाने व वीजांनी लातूर तालुक्यातील एक, रेणापूर तालुक्यातील एक व जळकोट तालुक्यातील एक, अशा तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. दुधाळ जनावरांमध्ये लातूर तालुक्यातील लहान ५, मोठे २ एकुण ७, औसा तालुक्यातील मोठे ६, ओढकाम करणारे जनावरे २ असे ८, रेणापूर तालुक्यातील १ मोठे, ओढकाम करणारे १ मोठे, अशी दोन जनावरे, निलंगा तालुक्यातील लहान ६, मोठे १२, ओढकाम करणारे मोठे २, असे २० जनावरे, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील लहान १, मोठे २, असे ३, देवणी तालुक्यातील लहान १, उदगीर तालुक्यातील लहान ३४, मोठे ८, असे ४२ जनावरे, जळकोट तालुक्यातील लहान १, मोठे ६, ओढकाम करणारे १, असे ८, अहमदपूर तालुक्यातील मोठे २ तर चाकुर तालुक्यातील मोठे ४, ओढकाम करणारे मोठे १, असे ५, एकुण ९८ जनावरांची जीवित हानी झाली आहे.
पावसामुळे लातूर तालुक्यातील एका घराची पूर्णत: पडझड झालेली आहे. तसेच याच तालुक्यातील एका घराची अंशत: पडझड झाली आहे. रेणापूर तालुक्यातील ४, निलंगा तालुक्यातील १, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील २, चाकुर तालुक्यातील १, अशा ८ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली आहे. या पावसाच्या फटक्यामुळे लातूर तालुक्यातील १३ तर चाकुर तालुक्यातील ५३, असे एकुण ६६ शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.