राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास
जयपूर : वृत्तसंस्था
आयपीएल २०२५ स्पर्धेतील आज ४७ व्या सामन्यात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी गुजरात टायटन्सच्या अनुभवी गोलंदाजांवर चांगलाच तुटून पडला आणि त्याने अवघ्या ३५ चेंडूत वादळी शतक झळकावून इतिहास रचला. आयपीएलच्या इतिहासात वेगवान शतक झळकावणारा सर्वांत युवा आणि पहिला भारतीय ठरला. त्याने युसूफ पठाण याचा विक्रम मोडित काढला. युसूफ पठाणने ३७ चेंडूत शतक झळकावले होते.
राजस्थान रॉयल्सच्या युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने आज गुजरात टायटन्सविरोधात मोहमद सिराज, इशांत शर्मा आणि राशिद खानसारख्या अनुभवी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने यशस्वी जयस्वालसोबत डावाची सुरुवात करताना अतिशय आक्रमक फलंदाजी केली आणि ३५ चेंडूंचा सामना करीत वेगवान शतक झळकावले. तो या स्पर्धेत सर्वांत वेगवान शतक झळकावणारा युवा फलंदाज ठरला. त्याने ७ चौकार आणि ११ षटकार खेचले. त्याने आज १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि तो या हंगामातील सर्वांत वेगवान अर्धशतक झळकवणारा पहिला फलंदाज ठरला. यात त्याने निकोलस पुरनला मागे टाकले. अर्धशतकानंतर त्याने अवघ्या १८ चेंडूत शतकापर्यंत मजल मारली. त्यामुळे त्याच्या नावावर नवे विक्रम नोंदले गेले.