छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
बुलडाण्यात एका रात्रीत नागरिकांना टक्कल पडत असल्याची घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात कुटुंबातील तीन चिमुकल्यांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा आला आहे. एक ३० महिन्यांचा, दुसरा ९ वर्षांचा आणि एक ११ वर्षे वयाचा अशा ३ बालकांना आजाराने कवटाळले आहे. या धक्कादायक प्रकारानंतर आरोग्य यंत्रणा हादरली असून तिन्ही मुलांवर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील मौजे खंबाटवस्ती पाथ्री येथे ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा आला आहे. या तिन्ही मुलांवर छत्रपती संभाजीनगरात उपचार सुरू आहेत. विशेष बाब म्हणजे ही तिन्ही मुले नातेसंबंधात आहेत. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.
सुरुवातीला ९ वर्षीय मुलाला १२ जुलै रोजी अचानक लुळेपणा, अशक्तपणा आला. आधी गावात उपचार घेतले. प्रकृती खालावत असल्याने मुलाला छत्रपती संभाजीनगरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर १६ जुलै रोजी ११ वर्षीय मुलालाही याच कारणामुळे दाखल करण्यात आले. तर, ३० महिन्यांच्या बालकाला १७ जुलै रोजी उपचारासाठी भरती करावे लागले. यापैकी दोन मुलांवर आयसीयूत आणि ३० महिन्यांच्या बालकावर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या खंबाटवस्ती पाथ्री येथे सर्वेक्षण हाती घेण्यात आले.
या मुलांची आरोग्य विभागाने ‘अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस’ (एएफपी) संशयित रुग्ण म्हणून नोंद केली आहे. ‘अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस’ची स्थिती ही पोलिओ, गुलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजारासह अन्य काही आजारांमध्ये आढळते. दरम्यान सध्या गावात पिण्यासाठी वापरल्या जाणा-या पाण्याचा वापर थांबवला आहे. तसेच गावातील नागरिकांसाठी बाहेरून शुद्ध आणि निर्जंतुक केलेले पाणी सुरू करण्यात आले आहे. परंतु या चिमुकल्यांना कोणत्या आजाराने ग्रासले आहे हे अद्यापही समोर आलेले नाही.
सर्वेक्षणाला सुरुवात
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर खंबाट वस्ती येथे आरोग्य विभागाने सर्वेक्षणाला सुरुवात केली. यात तीन बालकांव्यतिरिक्त इतर बालकांमध्ये लक्षणं आढळली नाहीत. तिन्ही मुलं एकमेकांचे नातेवाईक आहेत. सध्या त्या दृष्टीने तपास केला जात आहे. गावात पिण्यासाठी असलेल्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी सुरू आहे. तोपर्यंत पिण्यासाठी पाणी वापरू नये, अशा सूचना नागरिकांना दिल्या आहेत. या मुलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. ‘अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस’ संशयित म्हणजेच पोलिओ, गुलेन – बॅरे सिंड्रोम (जीबीएस) म्हणून यांची नोंद करण्यात आली आहे. त्यांचे नमुने एनआयव्हीला पाठवले आहेत. तसे गावाचे सर्वेक्षण सुरू आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिली.