लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात ६० वर्षांवरील मतदारांची संख्या ३ लाख ५५ हजार ३३९ एवढी आहे. यात शंभर वर्षांवरील १ हजार ६४५ मतदार आहेत. तसेच ९० ते ९९ वयोगटातील मतदारांची संख्या १३ हजार २०८ आहे. निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचा हक्क बजावताना गैरसोय होणार नाही, यासाठी निवडणुक आयोगाकडून सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.
जिल्ह्यात ६० वर्षांवरील मतदारांची संख्या ३ लाख ५० हजारांवर आहे. विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांची मते निर्णायक ठरतात. ज्यांना मतदान केंद्रांपर्यंत येणे शक्य नाही, अशा मतदारांची सोय व्हावी म्हणून विविध उपाययोजना, सुविधा निवडणुक आयोगाकडून केल्या जातात. जिल्ह्यात शंभरी पार केलेल्या मतदारांची संख्या १ हजार ६४५ एवढी आहे. यात ६८१ पुरुष तर १६४ महिला मतदारांचा समावेश आहे. शंभरी पार केलेल्या मतदारांत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ३७८, लातूर शहर विधानसभा मतदारसंघात ४३१, अहमदपूर विधानसभा मतदारसंघात २५४, उदगीर विधानसभा मतदारसंघात १५४, निलंगा विधानसभा मतदारसंघात ३०५ तर औसा विधानसभा मतदारसंघात १२३ मतदारांचा समावेश आहे.
ज्येष्ठ मतदारांची सर्वाधिक संख्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघात आहे. या मतदारसंघात ६८ हजार ३१ मतदार हे ६० वर्षांपेक्षत्त अधिक वयाचे आहेत. तर सर्वात कमी ज्येष्ठ मतदार हे उदगीर विधानसभा मतदारसंघात आहेत. तेथील संख्या ३७ हजार २६२ इतकी आहे. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघाची विधानसभेची निवडणुक शांततापुर्ण, भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे सहाही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुक तयारीचा आढवा वारंवार घेत आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात २४० क्षेत्रिय अधिकारी, ४२ भरारी पथके राहातील. याशिवाय ३६ स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम, १८ व्हिीडीओ शुटिंग पथके तैनात असणार आहेत.