21 C
Latur
Wednesday, February 4, 2026
Homeमहाराष्ट्र३ लाख ९६ हजारांहून अधिक उमेदवार नापास; महा-टीईटीचा धक्कादायक निकाल!

३ लाख ९६ हजारांहून अधिक उमेदवार नापास; महा-टीईटीचा धक्कादायक निकाल!

मुंबई : प्रतिनिधी
उद्याच्या पिढीला घडवणा-या शिक्षकांची पात्रता ठरवणा-या महा-टीईटी परीक्षेचा २०२५ चा निकाल जाहीर झाला असून या निकालाने संपूर्ण शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का दिला आहे. राज्यातील लाखो उमेदवारांनी अपेक्षेने दिलेल्या या परीक्षेत केवळ ११.२८ टक्के उमेदवारच उत्तीर्ण झाले आहेत. तर तब्बल 3 लाख ९६ हजारांहून अधिक उमेदवार नापास ठरल्याने ‘गुरुजीच नापास?’ असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, एकूण ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी महा-टीईटीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ लाख ४६ हजार ७३० उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित राहिले, तर सुमारे २८ हजार ९३९ उमेदवार गैरहजर राहिले. अंतिम निकालात फक्त ५० हजार ३६९ उमेदवार पात्र ठरले असून उर्वरित ३ लाख ९६ हजार ३२५ उमेदवार अनुत्तीर्ण झाले आहेत.
पेपर १ आणि पेपर २ या दोन्ही स्तरांवर नापासांचे प्रमाण चिंताजनक आहे.

इयत्ता पहिली ते पाचवीसाठी असलेल्या पेपर १ मध्ये २ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. यामध्ये उपस्थित उमेदवारांपैकी केवळ सुमारे ११.४७ टक्केच यशस्वी झाले. पेपर २ म्हणजे इयत्ता सहावी ते आठवीसाठीच्या परीक्षेतही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. या पेपरचा निकाल ११.१३ टक्क्यांवरच मर्यादित राहिला.

माध्यमनिहाय आणि विषयनिहाय निकाल पाहिल्यासही मोठी तफावत दिसून येते. कन्नड माध्यमाचा निकाल तुलनेने चांगला असून तो १५ टक्क्यांच्या पुढे आहे. मराठी, हिंदी आणि तेलुगू माध्यमाचा निकाल सरासरीच्या आसपास आहे. मात्र उर्दू, इंग्रजी आणि विशेषत: गुजराती माध्यमाचा निकाल अत्यंत कमी टक्केवारीत आहे. गणित-विज्ञान आणि सामाजिक विज्ञान या विषयांमध्येही अपेक्षेपेक्षा कमी निकाल लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR