27.4 C
Latur
Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्र३ वर्षांपेक्षा जास्त काळ राहिलेल्यांची बदली करा

३ वर्षांपेक्षा जास्त काळ राहिलेल्यांची बदली करा

परिवहनमंत्र्यांचे एसटी महामंडळाला आदेश

मुंबई : प्रतिनिधी
सर्वसाधारणपणे सरकारी कार्यालयात नोकरी करणा-या अधिका-यांची तीन वर्षांनी बदली करण्यात येते. मात्र, काही अधिकारी नेतेमंडळी व वरिष्ठांची मर्जी सांभाळत आपली बदली होऊ देत नाहीत. एसटी महामंडळही याला अपवाद नाही. त्यामुळे एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात ३ वर्षापेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिका-यांची तातडीने बदली करा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले.

आमदार गोपिचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने एसटी यासंदर्भात मागणी केली होती. त्याची दखल घेऊन सरनाईक यांनी वरील आदेश दिले. एसटी कामगार संघटनांकडून कर्मचा-यांच्या प्रश्नांसंदर्भात बोलावलेल्या बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार संघटनांची बाजू ऐकून घेत अधिका-यांच्या बदलीचे निर्देश दिले. या बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्या सह एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले की, अनेक अधिकारी एकाच मुख्यालयात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसल्यामुळे त्यांचे काही ठराविक कर्मचा-यांशी हितसंबंध निर्माण होतात. त्यातून ते इतर सर्व सामान्य कर्मचा-यांवर अन्याय करतात. याचा विपरीत परिणाम एस टी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर होत आहे. त्यामुळे भविष्यात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या अधिका-यांची तातडीने बदली करावी. या मागणीला दुजोरा देत मंत्री सरनाईक यांनी याबाबतचा आढावा घेऊन एसटी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश दिले.

एसटी कर्मचा-याच्या आर्थिक प्रश्नांवर चर्चा
या बैठकीत एसटी कर्मचा-यांच्या आर्थिक मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. अधिवेशन संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कर्मचा-यांना योग्य न्याय देता येईल, असा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन सरनाईक यांनी शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) बसस्थानक परिसरातील समस्या संदर्भात आमदार सत्यजित तांबे व अमोल खताळ यांच्या शिष्टमंडळासमवेत मंत्री सरनाईक यांनी चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी विस्तारित जागा देणे, नाशिक-पुणे महामार्गावरुन जाणा-या बसेस संगमनेर बसस्थानकामध्ये थांबवणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच, काही निर्देशही संबंधित अधिका-यांना देण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR