नवी दिल्ली : नवीन वर्षात कोरोना महामारीने पुन्हा एकदा चिंता वाढवली असून भारतातील दररोज कोविड-१९ संसर्गाची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी कोरोना रुग्णांच्या ७७४ नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासांत दोन रुग्णांचा मृत्यू झाला. देशात सध्या कोरोनाचे ४१०० हून जास्त सक्रिय रुग्ण आहेत. ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असून ही बाब चिंताजनक आहे.
सध्या जगासह देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा नवीन जेएन.१ सब-व्हेरिंयट वेगाने पसरताना दिसत आहे. नव्याने आढळण्याच्या रुग्णांमधील बहुतांश प्रकरणे जेएन.१ सब-व्हेरियंटची असल्याने चिंता वाढली आहे. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाचा जेएन.१ सब-व्हेरियंट अतिशय वेगाने पसरणारा असला, तरी याची लक्षणे सौम्य आहेत आणि रुग्ण याच्या संसर्गातून लवकर बरे होते आहे. पण असे असले तरी तज्ज्ञांनी याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.
चिंता वाढली
कोरोना विषाणू काळानुरुप स्वत:मध्ये बदल करत असल्याने जगभरातील शास्त्रज्ञांकडून जीनोम सीक्वेंन्सिग आणि संशोधन सुरु आहे. कोरोनाचा अभ्यास करणा-या संशोधकांनी म्हटले आहे की, लसीकरण आणि रोगप्रतिकारक शक्तीमुळे आपल्या शरीराला कोविड-१९ विषाणूची सवय झाली आहे. नवीन व्हेरियंटचा संसर्ग आणि गंभीर आजारांचा धोका आता लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, पण कोरोना विषाणूचे जेएन.१ बदलेले स्वरूप एक भीतीदायक आहे. जगभरात जेएन.१ अतिशय वेगाने पसरत असून हे भविष्यातील धोक्याचा अलर्ट असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
गंभीर परिणाम
कोरोनाच्या नवीन जेएन.१ व्हेरियंटचे दोन गंभीर परिणाम होऊ शकतात. पहिले म्हणजे कोरोना महामारीविरुद्धचा लढा आपल्याला संपवता येणार नसून हा लढा आपल्याचा दीर्घकाळ सुरू ठेवावा लागेल. तर, दुसरा परिणाम म्हणजे जेएन. १ व्हेरियंटचा प्रसार भविष्यात निर्माण होणा-या संभाव्य धोकादायक नवीन कोविड व्हेरियंटसाठी अनुकूल वातावरण तयार करू शकतो आणि हे मानवासाठी घातक ठरू शकते.
तज्ज्ञांनी काय सांगितले?
मिनेसोटा विद्यापीठातील सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीज रिसर्च अँड पॉलिसीचे संचालक डॉ. मायकेल ऑस्टरहोम यांच्या मते, उच्च संक्रमणक्षमतेचा प्रकार कोरोना संक्रमण वाढवण्यासोबतच विषाणूमधील नवीन बदलांसह अधिक संसर्गजन्य आणि प्राणघातक व्हेरियंटना जन्म देऊ शकतो. कोरोना महामारीच्या सुरूवातीला कोविड विषाणूच्या अल्फा आणि गामा या व्हेरियंटच्या पहिल्या लाटेमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली, पण त्याचा प्रसार खूप जास्त होता. त्यामुळे त्यानंतर कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकाराचा उदय झाला आणि डेल्टा व्हेरियंट जगभरातील मृत्यूंमध्ये झपाट्याने वाढ झाली. जेएन. १ प्रकाराचे जलद गतीने होणारा संसर्गानंतर येणा-या संभाव्य व्हेरियंटबाबतीतही अशी शक्यता वर्तवली जात आहे.