गुवाहाटीत धावांचा पाऊस, भारताचा ऐतिहासिक विजय
गुवाहाटी : वृत्तसंस्था
गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या दुस-या एकदिवसीय सामन्यात अक्षरश: धावांचा पाऊस पडला. दोन्ही संघांच्या फलंदाजांनी गोलंदाजांची अक्षरश: धुलाई करत तब्बल ८११ धावा केल्या. या सामन्यात एक-दोन नव्हे तर ४ शतके आणि एक द्विशतक पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजकडून शाई होप, जॉन कॅम्पबेल आणि अमीर जांगू यांनी शतक झळकावले तर भारताकडून रोहित शर्माने शतक ठोकत दमदार कमबॅक केले आणि कर्णधार शुभमन गिलने द्विशतक झळकावत इतिहास रचला. या सामन्यात भारताचा ऐतिहासिक विजय झाला.
शुभमन गिलचे द्विशतक आणि रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने दुस-या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर ८ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ५० षटकांत ७ गडी गमावून ४०५ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाने केवळ ४३.३ षटकांत ४०६ धावा करून विजय मिळवला. या फॉरमॅटमधील भारताचा हा सर्वात मोठा पाठलाग होता. तरीही भारताने सहज विजय मिळविला. या विजयात सलामीवीर रोहित शर्माचे शतक आणि शुभमन गिलचे शतक महत्त्वपूर्ण ठरले.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने धावांचा डोंगर उभा केला. जॉन कॅम्पबेल, शाई होप आणि अमीर जांगू यांच्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने ५० षटकांत ७ गडी गमावून ४०५ धावा केल्या. ही वेस्ट इंडिजची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. विशेष म्हणजे भारताविरुद्ध कॅरिबियन संघाने वनडेत पहिल्यांदाच ४०० धावांचा टप्पा ओलांडला. अमीर जांगूने सर्वाधिक १४४ धावांची खेळी केली.
४०० धावांचा पाठलाग
करण्याची दुसरी वेळ
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ४०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पार करण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. यापूर्वी २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय सामन्यात ४३८ धावांचा पाठलाग करून विजय मिळवला होता.
शुभमन गिलचे
विक्रमी द्विशतक
शुभमन गिलने ११७ बॉलमध्ये द्विशतक पूर्ण करत इशान किशनचा विक्रम मोडला. इशानने १२६ बॉलमध्ये बांगलादेश विरोधात द्विशतक केले होते. आज गिलने त्याचा विक्रम मोडला. गिलने नाबाद १३३ चेंडूत २३३ धावा केल्या. त्याने २४ चौकर आणि ८ षटकार ठोकले. त्याने दुस-यांदा द्विशतक झळकावले. या आधी न्यूझीलंडविरोधात २०२३ मध्ये हैदराबाद येथे १४९ चेंडूत २०८ धावा केल्या होत्या.
















