लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात या वर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. भूजल विभागाने केलेल्या विहिरींच्या तपासणीत पाणी पातळीत १.५४ मीटरने घट झाल्याचे निदर्शनास आले होते. ग्रामीण भागातील ५२ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. यामुळे जिल्ह्यात उन्हाळ्याच्या कालावधीत तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
लातूर जिल्ह्यातील १०९ जुन्या शिवकालीन विहिरींचे वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाच्या टिमकडून जानेवारी, मार्च, मे आणि ऑक्टोबर महिन्यात भूजल पातळीचे निरीक्षण करण्यात येते. त्यानुसार ऑक्टोबरअखेर जिल्ह्यातील भूजल पातळीची तपासणी भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्या जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी केली असता जिल्ह्याच्या भूजल पातळीत गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत १.५४ मीटरने घट झाल्याचे निदर्शनास आले होते. वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाकडून सप्टेंबर ते जून या कालावधीत ५२ गावांत पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे या वर्षी टंचाईच्या झळा अधिक जाणवणार आहेत.
लातूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान पाणीटंचाई निवारणासाठी ४ कोटी २९ लाख ८६ हजार रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये जिल्ह्यातील २१८ गावे आणि १२५ वाड्यांसाठी ३६७ उपयोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून आवश्यकतेनुसार त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
डिसेंबरपर्यंत २५ गावांत पाणीटंचाई जाणवणार
लातूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाच्या सर्व्हेनुसार सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत २५ गावांत पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. यात लातूर तालुक्यातील भुईसमुद्रगा, बोरगाव बु., गातेगाव, कारसा, नांदगाव, पाखरसांगवी, टाकळगाव, वांजरखेडा, रेणापूरमधील दवणगाव, डिघोळ दे.,खरोळा, पळशी, रेणापूर व समसापूर, औसामधील बोरगाव न., कार्ला, मासुर्डी, नांदुर्गा, शिवली, टाका, निलंगामधील ब्रह्मवाडी, डांगेवाडी, शिरूर अनंतपाळमधील शिवपूर, उजेड, अहमदपूरमधील खंडाळी, वायगाव या गावात पाणीटंचाईची समस्या जाणवण्याची शक्यता आहे.
एप्रिल ते जूनपर्यंत १५ गावांत पाणीटंचाई भासणार
वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाच्या सर्व्हेनुसार नव्या वर्षात एप्रिल ते जूनपर्यंत १५ गावांत पाणीटंचाई जाणवणार आहे. यात लातूर तालुक्यातील ममदापूर, रेणापूरमधील पानगाव, तत्तापूर, औसामधील बुधोडा, निलंगामधील अंबुलगा, गोर, केळगाव, मदनसुरी, शिवणी कोतल, ताजपूर, उदगीरमधील करखेली, किन्नीयल्लादेवी, अहमदपूरमधील मानखेड, वळसंगी, चाकूर तालुक्यातील कबनसांगवी या गावांत उन्हाळ्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे.