नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत जुन्या चेह-यांसोबतच अनेक नवे चेहरे संसदेत दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नव्या खासदारांमध्ये कोट्यधीश किती खासदार आहेत, याचा रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. निवडून आलेल्या ५४३ नूतन खासदारांपैकी तब्बल ९३ टक्के खासदार करोडपती असल्याची माहिती मिळाली आहे. ९३ टक्के म्हणजे ५०४ खासदार कोट्यधीश आहेत. निवडणूक हक्क संघटना असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) हा अहवाल जारी केला आहे. २०१४, २०१९ च्या तुलनेत कोट्यधीश खासदारांची संख्या यावेळी अधिक असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर झाला. यामध्ये निवडून आलेल्या ५४३ खासदारांपैकी ९३ टक्के म्हणजेच ५०४ खासदार करोडपती आहेत. २०१९ आणि २०१४ च्या तुलनेत २०२४ मध्ये निवडून आलेल्या कोट्यधीश खासदारांची संख्या अधिक आहे. २०१९ मध्ये ८८ टक्के खासदार कोट्यधीश होते तर २०१४ च्या लोकसभेत ८२ टक्के खासदार कोट्यधीश होते. या तुलनेत २०२४ चे प्रमाण तब्बल ९३ टक्क्यांवर गेलेले आहे. त्यामुळे यावेळी कोट्यधीश खासदारांची संख्या वाढली आहे. निवडणूक हक्क संघटना असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) यावर्षी निवडून आलेल्या सर्वात श्रीमंत खासदारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली.
टॉप-३ श्रीमंत खासदार
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या टॉप-३ श्रीमंत खासदारांची संपत्ती मोठ्या प्रमणात आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही खासदार एनडीएचे आहेत. एडीआरच्या अहवालानुसार आंध्र प्रदेशातील गुंटूरमधून निवडून आलेले टीडीपी खासदार चंद्रशेखर पेम्मासानी हे सर्वात श्रीमंत खासदार आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती ५७०५ कोटी रुपये आहे तर तेलंगणातील भाजपच्या चेवेल्ला लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले कोंडा विश्वेश्वरा रेड्डी हे दुस-या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत. त्यांची एकूण संपत्ती ४,५६८ कोटी रुपये आहे. तसेच कुरुक्षेत्र, हरियाणाचे भाजप खासदार नवीन जिंदाल हे देशातील तिस-या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत. त्यांची एकूण संपत्ती १,२४१ कोटी रुपये आहे.
महाराष्ट्रात सर्वात श्रीमंत खासदार
महाराष्ट्रात सर्वात श्रीमंत खासदार कोण, असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. यात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे राज्यातील सर्वात श्रीमंत खासदार आहेत. उदयनराजे भोसले यांची संपत्ती तब्बल २२३ कोटी रुपये इतकी आहे. सातारा लोकसभेत झालेल्या अटीतटीच्या लढतीत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा ३२ हजार मतांनी पराभव केला.