मानवत/प्रतिनिधी
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाथरी विधानसभा मतदार संघाचे आ. राजेश विटेकर यांनी मानवत व परभणी तालुक्यातील ५४ गावांना पिण्याचे पाणी व सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे संबंधित विभागाला आदेश दिले. त्यामुळे आ. विटेकरांच्या पहील्याच पाठपुराव्याला यश आले असून नागरीकातून त्यांचे कौतूक होत आहे.
मानवत व परभणी तालुक्यातील ५४ गावांना पिण्याचे व सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आ. विटेकर यांनी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागणीचे निवेदन आणि त्यासोबत जोडलेल्या अहवालाचे निरीक्षण करून तात्काळ प्रधान सचिव जलसंपदा व मुख्य अभियंता लाभक्षेत्र विकास विभाग छ. संभाजीनगर यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. या प्रस्तावामुळे शेतक-यांना शेतीसाठी पाणी आणि पिण्याचे पाणी मिळणार असल्याने लाखो नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे.
यावेळी आ. रत्नाकर गुट्टे, मानवतचे युवा नेते डॉ.अंकुश लाड, मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पंकज आंबेगावकर व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
तुमचे जनहिताचे काम मंजूर होणे गरजेचे
आमदारकीच्या अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे आणि पहिलेच काम जनहिताचे घेऊन तुम्ही तुमच्या कार्याची योग्य सुरुवात केली आहे. त्यामुळे हे काम मंजूर होणे गरजेचे आहे असे कौतुकोद्गार काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.राजेश विटेकर यांच्या निवेदनावर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.