लातूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जिल्हास्तरावर गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पाच महिन्यांत ३१४ रुग्णांना २ कोटी ५६ लाख ८५ हजारांची आर्थिक मदत मिळावून देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक १०५ मध्ये हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात प्रथमच सुरु झालेला हा उपक्रम गरजू, गरीब आणि संकटग्रस्त नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एक प्रभावी दुवा ठरत आहे. या कक्षामार्फत प्राप्त अर्जांची छाननी करून आवश्यक वैद्यकीय कागदपत्रांची पूर्तता केली जाते आणि प्रस्ताव पुढे मुंबई येथील मुख्यमंत्री सहायता कक्षाकडे पाठवले जातात. यामुळे रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक सहाय्य मिळवण्याची प्रक्रिया आता जिल्हास्तरावरच पूर्ण होत आहे. त्यामुळे जनआरोग्य योजनेचा लाभ न मिळणा-या नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेला संलग्न नसल्यास रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदतीसाठी अर्ज करु शकतात. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून अनेक आजारावर उपचार घेता येत नाही, अशा रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधार घेता येणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आवश्यक कागदपत्रे १. विहित नमुन्यातील अर्ज. २. रुग्ण दाखल असल्यास त्याचा जिओ-टॅग फोटो. ३. वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक (खाजगी रुग्णालयात दाखल असल्यास जिल्हा शल्यचिकित्सकांनी प्रमाणित केलेले). ४. तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला. ५. रुग्णाचे आधार कार्ड, रेशन कार्ड. ६. संबंधित आजाराच्या निदान आणि उपचाराशी संबंधित कागदपत्रे. ७. अपघातग्रस्त रुग्णांसाठी एफआयआर अहवाल. ८. अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीची मान्यता.