मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील काही भागात १६ जूनपासून शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेणा-या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येत आहेत. केवळ १५ दिवसांत म्हणजे १६ ते ३० जून या कालावधीत तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
प्रताप सरनाईक म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा १६ जूनपासून सुरू झाल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६.६६ टक्के इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३.३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. या अंतर्गत १ लाख ६१ हजार २०४ विद्यार्थ्यांना त्यांच्या-त्यांच्या शाळेत जाऊन एसटी कर्मचा-यांनी पास वितरित केले आहेत. त्याचप्रमाणे शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ योजनेंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणा-या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. या अंतर्गत ३ लाख ६० हजार १५० विद्यार्थिनींना त्यांच्या शाळेत जाऊन पास वितरित करण्यात आले.
यापूर्वी विद्यार्थ्यांना एसटीचे पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून घ्यावे लागत होते. अथवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घेतले जात असत. पण आता विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा-महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचा-यांकडून त्या विद्यार्थ्यांना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येत आहेत.