लातूर : प्रतिनिधी
भूमिअभिलेख विभागाने स्वामित्व योजनेतंर्गत लातूर जिल्हयातील ज्या गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून हद्द निश्चिती करून नागरीकांचे प्रॉपर्टी कार्ड तयार केले आहेत. अशा जिल्हयातील २४ ग्रामपंचायतींच्या ४ हजार ८९३ नागरीकांना ३ हजार ६४२ (मालमत्ता पत्रक) प्रॉपर्टी कार्ड लवकरच वितरीत केले जाणार आहे.
राज्य महसूल विभाग, राज्य पंचायत राज विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार यांचे वतीने स्वामित्व योजनेची अंलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेद्वारे गावातील मिळकत धारकाला दस्तऐवजाचा हक्क’ मिळणार आहे. जिल्हयात स्वामित्व योजनेला महत्वाचे विविध पैलू आसून यातील महत्वाचे म्हणजे मालमत्तेवर नागरीकांना कर्ज उपलब्ध होणार आहे.
मालमत्तेचे विवाद कमी होण्यास मदत होणार आहे. ग्रामपंचायतीला गाव विकास नियोजनात सुलभता प्राप्त होणे याबरोबरच पंचायतीला स्व उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी उपलब्ध संसाधनांचा परिचय करुन देत ग्राम परिवर्तन घडविण्याचे असाधारण सामर्थ्य या योजनेत आहे. असे असले तरी या योजनेबाबत ग्रामीण क्षेत्रातील लोकांमध्ये आणि लोकप्रतिनिधींमध्ये या योजनेबाबत अधिक जागृतीची देखील आवश्यकता आहे.