लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने दि. १९ नोव्हेंबर रोजी कारवाई करत राज्य शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ (गुटखा) अवैधरीत्या वाहतूक करणा-या एकास पकडले. या कारवाईत एकूण ५ लाख २० हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटख्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. १९ नोव्हेंबर रोजी रोहिणा ते बोथी रोडमार्गे पांढरी स्विफ्ट डिझायर कारमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटख्याची वाहतुक केली जाणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल. पथकाने बोथी तांडा-रोहिणा रोडवर सापळा लावून १७.५५ वाजता रोहिणा गावाच्या बाजूने पांढ-या रंगाची स्विफ्ट डिझायर कार अडवून झडती घेतली. कारची तपासणी करताना डिक्कीमध्ये, पाठीमागील सीटखाली पांढ-या व खाकी रंगाच्या पोत्यांमध्ये प्रतिबंधित गुटखा आढळून आला. त्यामध्ये विमल पान मसाला, व्ही-१ तंबाखूचे एक लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल तसेच चार लाख रुपयाची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एमएच-०५ एएक्स ९६१० असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अभय दिनेश सोळंके, वय ३० वर्षे रा. मुंगी, ता. धारूर, जि. बीड हा राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री व अवैध व्यापार करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध चाकूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे यांचे निर्देशावरून, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सुर्यकांत कलमे, पाराजी पुठेवाड यांनी केली आहे.

