संभाजीनगर : प्रतिनिधी
२० ते ३६ टक्क्यांपर्यंत व्याजदराचे आमिष दाखवून एलएफएस ब्रोकिंग कंपनीने देशभरात ६ हजारांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. देशभरात गाजत असलेल्या या घोटाळ्यातील कंपनीचा महाराष्ट्र प्रमुख विनोद बाळासाहेब माने (३०, रा. शिवशंकर कॉलनी, तानाजी चौक) याला मंगळवारी अटक केली. शहर आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. न्यायालयाने त्याला ७ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.
शहरात २० फेब्रुवारी रोजी या कंपनीवर फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरात कंपनीचे माने व शहर व्यवस्थापक विनोद त्र्यंबक साळवे यांनी ३५ पेक्षा अधिक गुंतवणूकदारांकडून ३ कोटींपेक्षा अधिक रक्कम हडप केली. जुलै २०२३ मध्ये कंपनीला कुलूप लावून आरोपी पसार झाले होते. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अशोक अवचार, अंमलदार विठ्ठल मानकापे यांनी कंपनीचा संचालक सय्यद जियाजूर रहेमान व शहर व्यवस्थापक विनोद साळवेला अटक केली होती. माने मात्र पसार होता. उपनिरीक्षक अवचार यांच्या पथकाने मंगळवारी त्याला भूम तालुक्यातून अटक केली.
११८ बँक खाती, ६३ मालमत्ता जप्त
आत्तापर्यंत कंपनीवर ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्र, झारखंड, गुजरातमध्ये गुन्हे दाखल आहेत. ईडीकडून याचा समांतर तपास सुरू असून, २४ मे रोजी त्यांनी संचालक दिलीप कुमार मैती व अनारुल हुसैनी यांना अटक केली. आत्तापर्यंत त्यांनी संचालकांची ११८ बँक खाती, ६३ मालमत्ता जप्त करण्यात यश मिळवले. ज्यात हॉटेल, रिसॉर्ट, जमीन, बंगला, फ्लॅटसह दुबईतील इमारत जप्त करण्यात आली आहे.