लातूर : योगिराज पिसाळ
लातूर जिल्हयातील प्रत्येक घरात जल जिवन मिशन योजनेच्याद्वारे प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा व्हावा या दृष्टी कोणातून लातूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने नियोजन केले आहे. आज घडीला जिल्हयातील ३ लाख ४६ हजार १९१ कुटूंबांना नळजोडणी देण्यात आली आहे. जिल्हयातील ९२२ पैकी ६८४ गावात १०० टक्के नळजोडणी पूर्ण झाली असून प्रति माणसी, प्रतिदीन ५५ लिटर पाणी पुरवठा नळाद्वारे होत आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने ग्रामीण भागातील प्रत्येक नागरीकाला दररोज ५५ लिटर शुध्द पाणी नळाद्वारे घरपोच पुरवठा करण्यासाठी जल जिवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. लातूर जिल्हयात ३ लाख ७३ हजार ८३९ कुटूंबे आहेत. त्यापैकी ३ लाख ४६ हजार १९१ कुटूंबांना नळजोडणी देण्यात आली आहे.
लातूर जिल्हयास १ एप्रिल २०२३ रोजी ४६ हजार ४७५ कुटंबांना नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट होते. ते डिसेंबर अखेर पर्यंत १८ हजार ८२७ कुटूंबांना नळ जोडण्या दिल्याने सदर कुटूंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा होत आहे. तसेच उर्वरीत २७ हजार ६४८ कुटंूबांना मार्च अखेर पर्यंत नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे. यात जवळपास १४ हजार २०० नळजोडण्या या महाराष्ट्र जिवन प्राधीकरणच्या माध्यमातून होणार आहेत. सदर यंत्रणेने जवळपास २ हजार घरांना नळजोडणी केली आहे. उर्वरीत कामास वेग येत असल्याचे सांगण्यात येत आहे.